चंद्रकांतदादा महाडिकांच्या बंगल्यावर; ‘भाजता’वर चर्चा !
By admin | Published: January 15, 2017 01:13 AM2017-01-15T01:13:32+5:302017-01-15T01:13:32+5:30
जिल्हा परिषदेचे राजकारण : ही तर तीळगूळ भेट - महादेवराव महाडिक
कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळात दोन नंबरचे स्थान असलेले महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील शनिवारी चक्क माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या पुलाची शिरोली येथील बंगल्यावर गेल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या राजकीय हालचाली तिथे झाल्या. महाडिक यांनी ही तीळगूळ भेट होती, असे सांगितले असले तरी शिवसेनेला वगळूनच भाजप, ताराराणी आघाडी आणि जनसुराज्य (भाजता) यांची एकत्रित आघाडी करून जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी तिथे व्यूहरचना निश्चित झाली असल्याचे समजते.
सकाळी साडेनऊ वाजता सुमारे अर्धा तास ही भेट झाली. यावेळी आमदार अमल महाडिक, स्वरूप महाडिक हे देखील उपस्थित होते. ‘गोकुळ’चे संचालक रणजित पाटील यांचा भाजप प्रवेश अजून झालेला नाही. रणजित पाटील हे महाडिक यांचे कट्टर समर्थक मानले जातात. तोही पदर या भेटीमागे होता, असे समजते. यापूर्वी गोकुळ अष्टमीला दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात ६ सप्टेंबर २०१५ ला माजी आमदार महाडिक यांनी पालकमंत्री पाटील यांना खाली वाकून नमस्कार केला होता. त्यावेळी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी तोंडावर होती. त्यामुळे महाडिक यांच्या या नमस्कारावरून बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. पालकमंत्री पाटील यांची राजकीय ताकद इतकी आहे की, ते कुणालाही बोलावून घेऊ शकतात; परंतु तेच थेट महाडिक यांच्या बंगल्यावर गेल्याने पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली.
महापालिका असो की नगरपालिका ‘भाजप’ला तसे निर्विवाद यश मिळालेले नाही. त्यात ग्रामीण राजकारणात ‘भाजप’ची ताकद तशी मर्यादित आहे. आणि जिल्हा परिषदेच्या सत्तेचा आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होतो. त्यामुळे ही सत्ता ताब्यात घेण्यासाठी दादांनी कंबर कसली आहे. त्यासाठीच दोन्ही काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील हाताला लागेल त्या कार्यकर्त्यास ते ‘भाजप’मध्ये घेत आहेत. त्याच रणनीतीचा भाग म्हणून पालकमंत्री पाटील-महाडिक यांची भेट झाली. महाडिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे; परंतु त्यांचा मुलगा आमदार अमल हा मात्र ‘भाजप’चाच आहे. व दुसरा मुलगा स्वरूप हा ताराराणी आघाडीचा प्रमुख असून, ही आघाडी ‘भाजप’चा मित्रपक्ष आहे.
दादांचा संपर्क नाही
दरम्यान, याबाबत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
राजकारणात मीच ‘वजीर’
४दरम्यान, या भेटीनंतर महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाडिक योग्यवेळी रणांगणात उतरणार आहे.
४त्यापासून बाजूला राहणार नाही. महाडिक गटाची ताकद काय आहे, हे त्यावेळी लोकांना समजलेच. बुद्धिबळाच्या खेळातील मीच ‘वजीर’ असून, हत्ती-घोडे यांच्यावर कशी चाल करायची, हे या महाडिकास नवीन नाही.’
मकर संक्रांती हा वर्षातील पहिला सण म्हणून शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री पाटील हे माझ्या घरी आले होते. त्यामध्ये अन्य कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
- महादेवराव महाडिक, माजी आमदार.