चंद्रकांतदादा उद्या पवारांना भेटणार!
By admin | Published: November 8, 2015 12:51 AM2015-11-08T00:51:11+5:302015-11-08T00:53:43+5:30
मुश्रीफ यांनाही निमंत्रण? : कोल्हापूर महापालिकेत सत्तेसाठी प्रयत्न करणार
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत महापौर कोणत्या पक्षाचा होणार याबाबत जिल्ह्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सद्य:स्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होऊन काँग्रेसचाच महापौर होण्याचे संकेत मिळत आहेत; पण पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे महापौर भाजपचाच होणार असल्याची चमत्काराची भाषा करीत आहेत. त्याबाबत उद्या, सोमवारी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पालकमंत्री पाटील यांची बैठक होत असून, या बैठकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, भाजप-ताराराणी आघाडी मंगळवारी (दि. १०) महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महानगरपलिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्तास्थापनेचा फॉर्म्युला यापूर्वीच जाहीर केला आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी महापौर हा काँग्रेसचाच होणार आहे.
महापौर आणि उपमहापौर या पदांची निवडणूक दि. १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या साथीने महापौर भाजपचाच करणार असल्याचा दावा आजही पालकमंत्री पाटील करीत आहेत. यासंदर्भात त्यांनी हालचाली गतिमान केल्या असल्या तरी सत्तेचा फॉर्म्युला कसा राहणार, याबाबत मात्र खुद्द भाजप-ताराराणी आघाडीतील नगरसेवकांनाच उत्सुकता आहे. राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सत्ता स्थापण्याच्या निर्णयाबाबत उद्या, सोमवारी मुंबईत शरद पवार यांच्याशी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची बैठक होणार आहे. या बैठकीस, आमदार हसन मुश्रीफ यांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचेही राजकीय गोटातून समजते. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेत सत्तेची गणिते कशी राहणार, याबाबत मात्र संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता आहे. दीपावलीच्या तोंडावर सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींमुळे अनेकांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे महानगरपालिकेतील एकूण संख्याबळ ४२ आहे. याशिवाय तीन अपक्ष नगरसेवकांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणार !
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे महापौर भाजपचाच होणार असा दावा करीत असले तरी आमदार हसन मुश्रीफ हे भाजपला घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून येते. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेससोबतच राहण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या गोटातून वर्तविली जात आहे.
शिवसेना भाजपसोबतच !
कोल्हापूर महानगरपालिकेतही शिवसेना भाजपसोबत राहणार का? याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तेवर अवलंबून होता; पण ‘कल्याण-डोंबिवली’मध्ये शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे कोल्हापुरातही भाजपसोबतच राहण्याचा शिवसेनेचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे भाजप-ताराराणी-शिवसेना असे एकूण ३६ संख्याबळ झाले आहे.
भाजप-ताराराणी महापौरपदाचा अर्ज भरणार
महापौर कोणाचा होणार, याबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्या, सोमवारी मुंबईतील शरद पवार व पालकमंत्री पाटील यांच्या बैठकीत निर्णय प्रलंबित राहिला तरीही भाजप-ताराराणी आघाडीतर्फे स्वतंत्रपणे महापौर आणि उपमहापौर पदांसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.