मैदानांना आवश्यक सुविधा पुरविणार --चंद्रकांतदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:41 AM2017-09-16T00:41:24+5:302017-09-16T00:44:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरकर हे फुटबॉलप्रेमी आहेत. शहरात अनेक चांगले, नामवंत खेळाडू आहेत. शाहू स्टेडियम आणि शिवाजी स्टेडियम येथे फुटबॉलचे सामने होतात; पण याठिकाणी सुविधांची वानवा आहे. शहरातील सर्व मैदानांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून खेळाशी संबंधित आवश्यक त्या सुविधा या ठिकाणी लोकसहभागातून उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.
सतरा वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धा दि. ६ ते २४ आॅक्टोबरदरम्यान भारतात होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने शुक्रवारी राज्यात ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ उपक्रम राबविण्यात आला. कोल्हापुरातील या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. येथील महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडागंणावर पालकमंंत्री पाटील यांच्या हस्ते फुटबॉलची किक मारून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाहू छत्रपती, महापौर हसिना फरास, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डी. बी. पाटील, ‘केएसबीपी’चे अध्यक्ष सूजय पित्रे प्रमुख उपस्थित होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, कोल्हापूर स्पोर्टस् डेव्हलपमेंट इनिशेटिव्ह, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरचे फुटबॉलप्रेम प्रसिद्ध आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने एक उत्साही वातावरण निर्माण व्हावे यासाठी सर्वांनी मिळून पुन्हा एकदा फुटबॉलमय होऊया आणि क्रीडा संस्कृती रूजवूया. शाहू छत्रपती म्हणाले, फुटबॉल हा जगभरात सर्वांत लोकप्रिय असणारा खेळ असल्याने महाराष्ट्राने यामध्ये मागे राहून चालणार नाही. कोल्हापुरात त्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे या खेळाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. या कार्यक्रमात महापौर हसिना फरास, शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. न्यू कॉलेजचे जिमखाना प्रमुख अमर सासने यांनी प्रास्ताविक केले. व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक अजित पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी आभार मानले.
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष एस. आर. चरापले, आर. डी. पाटील, आर. व्ही. शेटगे, सुभाष पवार, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, लालासो गायकवाड, सतीश सूर्यवंशी, आदींसह फुटबॉलप्रेमी, विद्यार्थी उपस्थित होते.
अभिनव उपक्रम राबविणारे एकमेव राज्य
या उपक्रमांतर्गत दहा लाखांहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. राज्यातील ३० हजार शाळांना प्रत्येकी तीन याप्रमाणे सुमारे लाखभर फुटबॉल वितरित करण्यात आले आहेत. राज्यात विविध पातळ्यांवर फुटबॉलचे सामने आज, शनिवारी खेळले जाणार आहेत. अशा प्रकारचा ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ हा अभिनव उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
नृत्याने जिंकली मने
या उपक्रमाच्या उद्घाटनानंतर
१२, १४, १६ आणि खुल्या गटातील खेळाडूंचे मैत्रीपूर्ण सामने खेळविण्यात आले. फिफा वर्ल्डकप साँगवरील गाण्यांवर युवकांनी, तर महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघातर्फे काढण्यात आलेल्या ‘डॉल्बी हटवा, जीवन वाचवा’ या माहितीपत्रकाचे प्रकाशन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.