चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : ‘लोकमत’ला खास मुलाखत

By admin | Published: November 4, 2014 12:11 AM2014-11-04T00:11:31+5:302014-11-04T00:25:12+5:30

नवे ऊसदर मंडळ स्थापणार

Chandrakant Dada Patil's Guilty: Special Interview with Lokmat | चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : ‘लोकमत’ला खास मुलाखत

चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : ‘लोकमत’ला खास मुलाखत

Next

विश्वास पाटील - कोल्हापूर-- काँग्रेस सरकारला कोणताही निर्णय घ्यायचा नसतो, त्यावेळी ते नुसतेच सदस्यीय मंडळाच्या घोषणा करत राहतात. ही सरकारची खोडच होती. ऊस दराबद्दलही निर्णय प्रलंबित करण्यासाठी त्यांनी नुसतीच सदस्यांची घोषणा केली होती. त्यामुळे आम्ही नव्याने ऊसदर मंडळाची स्थापना करणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे अशी काही चांगले माणसे त्यावर आम्ही पुन्हा घेऊच. त्याची लवकरच घोषणा केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही नूतन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज, सोमवारी येथे ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, आमदार ते आता पहिल्याच दणक्यात कॅबिनेट मंत्री अशी पाटील यांची राजकीय घोडदौड आहे. मंत्रिपदाची शपथ घेऊन येथे आल्यापासून त्यांच्या येथील संभाजीनगर निवासस्थानी नेते व कार्यकर्त्यांची रीघ लागली. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
पाटील म्हणाले, ‘सहकारामुळेच ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट झाला. सहकार चांगलाच आहे, परंतु त्यातील अप्प्रवृत्ती व भ्रष्टाचारामुळे तो बदनाम झाला, म्हणून सहकारातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यास माझे सर्वाधिक प्राधान्य राहील. त्यासाठी कायद्यात बदल करावा लागेल. मागच्या काँग्रेसच्या सरकारने सहकार कायद्यात आपल्याला सोयीचे काही बदल केले. हे बदल कायद्याने सुधारावे लागतील. डिसेंबरच्या अधिवेशनात हे करणे शक्य होणार नाही, परंतु मार्चच्या अधिवेशनात आम्ही हे नक्की करू.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५२ संचालकांना गैरव्यवहारप्रकरणी नोटिसा लागू केल्या. त्यांच्यावरील पुढील कारवाई सरकार करेल. कोण माजी मंत्री व कोण मोठे नेते होते याचा विचार केला जाणार नाही. अशा शिखर संस्थांतील गैरव्यवहार होत असताना तेथील अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी केलेला कानाडोळाही त्यास कारणीभूत असतो. राज्य बँकेच्या संचालकांवर तरी आम्ही कारवाई करूच, परंतु अधिकारीही त्यामध्ये दोषी असल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करू. सहकार खात्यात नेमके काय बदल करायला हवेत याचा अभ्यास आम्ही सुरू केला आहे. त्यासंबंधीचे प्रस्ताव खात्यातील अधिकाऱ्यांना व खातेबाह्य तज्ज्ञांकडून करून घेत आहोत. सहकार सुधारावा अशी अपेक्षा बाळगणारे व काही चांगले सुचवू पाहणारे अनेक अभ्यासू लोकआमच्या संपर्कात आहेत. त्यांची त्यासाठी जरूर मदत घेऊ.
सहकारातील भ्रष्टाचाराची शस्त्रक्रिया
सहकारी संस्थांमध्ये भाजपचा कार्यकर्ता निवडून येण्यासाठी काही वर्षांचा अवधी जावा लागेल, परंतु सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार संपविणे या खात्याचा मंत्री म्हणून सहज शक्य आहे व त्याच कामास माझे सर्वाधिक प्राधान्य राहील. त्यासाठी लागल्यास कोणतीही शस्त्रक्रिया करण्याची माझी तयारी आहे, असे सहकारमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

नव्या ऊसदर मंडळात खासदार राजू शेट्टी व विक्रमसिंह घाटगे अशांचा समावेश असेल.
सहकारातील भ्रष्ट्राचाराच्या समूळ उच्चाटनास प्राधान्य.
काँग्रेस सरकारने सहकार कायद्यात सोयीचे बदल केले.
मार्चच्या अधिवेशनात सहकार कायद्यात बदल करू.
राज्य बँकेवरील दोषी संचालक, अधिकाऱ्यांवर कारवाई होईल.

Web Title: Chandrakant Dada Patil's Guilty: Special Interview with Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.