चंद्रकांतदादा, सत्तेच्या मस्तीत राहिलात हेच चुकलं : मुश्रीफ यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:14 PM2019-11-01T12:14:37+5:302019-11-01T12:17:44+5:30
मंत्रिमंडळात दोन नंबरचे खाते असतानाही गेल्या पाच वर्षांत नजरेत भरण्यासारखे एकही काम केले नाही. घराकडे भेटायला येणाऱ्यांचा अपमान केला. अपॉइंटमेंटशिवाय कोणाला भेट दिली नाही. कोल्हापूरच्या जनतेचे प्रेम, विश्वास संपादू शकला नाहीत, कायम सत्तेच्या मस्तीत राहिलात, हेच तुमचे चुकले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. पालकमंत्री पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी ‘आमचं काय चुकलं?’अशी विचारणा जनतेला केली होती.
कोल्हापूर : मंत्रिमंडळात दोन नंबरचे खाते असतानाही गेल्या पाच वर्षांत नजरेत भरण्यासारखे एकही काम केले नाही. घराकडे भेटायला येणाऱ्यांचा अपमान केला. अपॉइंटमेंटशिवाय कोणाला भेट दिली नाही. कोल्हापूरच्या जनतेचे प्रेम, विश्वास संपादू शकला नाहीत, कायम सत्तेच्या मस्तीत राहिलात, हेच तुमचे चुकले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. पालकमंत्री पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी ‘आमचं काय चुकलं?’अशी विचारणा जनतेला केली होती.
तुम्ही आस्थेवाईकपणे जनतेची चौकशी केली असती, समस्या सोडवल्या असत्या तर लोकांनी डोक्यावर घेतले असते, चळवळी, आंदोलने दडपण्यासाठीच ताकद वापरली. कायम पोलिसांचा गराडाच सोबत घेऊन फिरलात. जनता आणि कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला नाहीत, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने आमदार म्हणून निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार समारंभ खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाला.
यावेळी बोलताना जनतेच्या वतीने काँग्रेस आघाडीचे नेते आमदार मुश्रीफ यांनी पालकमंत्र्यांच्या आवाहनानुसार प्रश्नाला उत्तर देताना जनतेला गृहीत धरले तर काय होते, याचा चांगला धडा भाजपला मिळाला असल्याचे सांगून सत्तेची मस्ती जनतेनेच उतरवली आहे. आता तरी वागण्याबोलण्यात सुधारणा करा, असा सल्लाच दिला. सत्तेची सूजही उतरली आहे. येथून पुढेच ते राजकारणात सौहार्दाचे वातावरण ठेवतील, जनतेचे प्रेम जिंकतील असा विश्वासही व्यक्त केला.
टोलचे श्रेय मंडलिक, पानसरे, एन.डी. यांचे
एलबीटी आमच्या काळात स्थगित झाला होता. टोल रद्दचे संपूर्ण श्रेय गोविंद पानसरे, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, दिवगंत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचे आहे. ते आम्ही रद्द केले, असा टेंभा पालकमंत्री पाटील यांनी मिरवू नये, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
-
द्वेषामुळेच शरद पवार व अजित पवार यांच्यामागे ईडीचा ससेमिरा
पालकमंत्र्यांनी व्यक्तिश: मला खूप त्रास दिला, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बँकेचा कलम ८८ चा निकाल उलटा द्यायला लावला. उच्च न्यायालयातून आम्ही स्थगिती आणल्यावर मला अध्यक्षपदावरून बाजूला करण्यासाठी १० वर्षांचा अध्यादेश आणला. त्यालाही आम्ही स्थगिती मिळविल्यावर पालकमंत्र्यांनी राज्य बँकेवर कलम ८८ अंतर्गत कारवाई सुरू केली.
माझ्यामुळेच अजित पवार यांच्यावर कलम ८८ नुसार कारवाई सुरू झाली. त्यालाही अडीच वर्षांची स्थगिती आल्यावर ईडीकडे आमची तक्रार केली. फक्त माझ्याबद्दल असलेल्या द्वेषामुळे ईडीने एफआयआर दाखल केला. माझ्यामुळे शरद पवार यांनाही यात गोवले गेले. आयकरचा छापाही टाकला. एवढा त्रास आजवर कुणी दिला नाही. मतभेद असू शकतात, पण ते प्रेमाने संपवायचे असतात; पण पालकमंत्र्यांनी द्वेषाने हे सर्व केले, त्याची शिक्षा त्यांना जनतेनेच दिली आहे.’