दिवसा स्वप्ने पाहणारे चंद्रकांतदादा सत्तेच्या नशेत

By Admin | Published: October 31, 2015 12:30 AM2015-10-31T00:30:48+5:302015-10-31T00:32:29+5:30

राजेश क्षीरसागर यांचा प्रतिटोला : माझी आमदारकी जनतेच्या जिवावरच

Chandrakant Dada who is dreaming day by day | दिवसा स्वप्ने पाहणारे चंद्रकांतदादा सत्तेच्या नशेत

दिवसा स्वप्ने पाहणारे चंद्रकांतदादा सत्तेच्या नशेत

googlenewsNext

कोल्हापूर : मला घरी बसवायचे दिवसा स्वप्न पाहणारे ‘दादा’ सत्तेच्या नशेत आहेत, असा प्रतिटोला आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकाद्वारे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना हाणला. माझी आमदारकी जनतेच्या जिवावरच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.गुरुवारी क्रशर चौक येथे झालेल्या सभेत पालकमंत्री पाटील यांनी ‘क्षीरसागर यांची ही शेवटचीच आमदारकी’ असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर शुक्रवारी आमदार क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मला कोणी घरी बसविणार, या धमक्यांना मी घाबरत नाही, असा पलटवार करीत, शिवसेनेशी वाकडं घ्याल तर ‘दादा,’ तुमचा पुढच्या निवडणुकीत ‘नाना’ होईल, हे ध्यानात ठेवा, असा खरमरीत इशारा देत, आमदार क्षीरसागर यांनी लॉटरी लागलेल्या या महोदयांची अवस्था म्हणजे टी.व्ही. मालिकेतील ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अशीच आहे. ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे’ या म्हणीप्रमाणे रांगत निवडून आलेल्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. ते सध्या त्यांच्याच स्वप्नात वावरत
असून जिल्ह्याचे दादा म्हणवून घेण्यासाठी त्यांनी गुंड, मटकेवाले अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या सात पिढ्या गेल्या, तरी शिवसेनेला ते कधीही संपवू शकत नाहीत, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.
क्षीरसागर म्हणाले, क्षीरसागर यांना घरी बसविणार म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांच्या मुठीत जणू काही शहरातील तीन लाख मतदार असून, ते स्वत: तीन लाख वेळा बटन दाबून आपल्याला पराभूत करणार आहेत, असेच त्यांना वाटते. पालकमंत्र्यांनी गेल्या दोन्ही विधानसभा आणि त्यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचा अभ्यास करावा. पहिल्या निवडणुकीत पालकमंत्री ६००० च्या मताधिक्याने निवडून आले होते. तर मी विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत ३७०० मताधिक्याने निवडून आलो होतो. उलट दुसऱ्या निवडणुकीत ‘दादां’चे मताधिक्य घटून ३००० वर आले, तर आपले
मताधिक्य वाढून २३ हजार ५०० वर गेले.
पुढील निवडणुकीत ते ५० हजारांवर जाईल. त्यामुळे शिवसेनेशी वाकडे घ्याल, तर पुढच्या निवडणुकीत ‘दादा’ तुमचा ‘नाना’ होईल, हे ध्यानात ठेवावे. माझी आमदारकी जनतेने ठरविलेली आहे. त्यामुळे अशा घरी बसविण्याच्या धमक्यांना आपण भीक घालत नाही. (प्रतिनिधी)


लाट ओसरल्यावर दादांना आमदारकी टिकविणे अवघड
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, दादांनी स्वत:च्या कारकिर्दीचा अभ्यास करावा आणि कोणत्या ठिकाणी ठोस विकासकाम केले, याचा खुलासा करावा. मोदींची लाट ओसरली की दादांना त्यांची आमदारकीही टिकविणे मुश्कील होऊन बसेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आम्हाला वंदनीय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना जिभेला आवर घालावा. अन्यथा, शिवसैनिकांची सटकली, तर दादांसह त्यांच्यासोबत असणाऱ्या ‘बेडकां’च्या पायांखालची वाळू घसरायला वेळ लागणार नाही.

Web Title: Chandrakant Dada who is dreaming day by day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.