चंद्रकांतदादांनी गायले कोळीगीत
By admin | Published: May 10, 2017 12:35 AM2017-05-10T00:35:07+5:302017-05-10T00:35:07+5:30
बालकलाकारांनी धरला ताल : नाट्य व चित्रपट अभिनय शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्याचे महसूलमंत्रिपद सांभाळणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातील वेगळ्याच पैलूचे दर्शन मंगळवारी येथे घडविले. येथे सुरू असलेल्या अभिनय शिबिराला अचानक भेट देऊन दादांनी चक्क तेथे ‘टिमक्याची चोली बाय, रंगान फुलायली... तुझी माझी जमली जोरी माझे वेसावकरीण बाय गो’ हे गाणे गायला सुरुवात केली आणि उपस्थित बालचमूने त्यांच्या गाण्यावर ताल धरला. एवढेच नव्हे तर दादांच्या या गाण्याला ‘वन्समोअर’चा आग्रहही झाला!
येथील कोल्हापूर थिएटर संस्थेच्या नाट्य व चित्रपट अभिनय शिबिराला ३ मेपासून सुरुवात झाली होती. या शिबिराचे उद्घाटनही चंद्रकांतदादा यांच्या हस्ते झाले होते. मंगळवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या दादांना हे शिबिर सुरू होते, त्या परिसरातून जाताना त्याची आठवण झाली आणि त्यांनी
गाडी या शिबिराकडे घ्यायला सांगितली. कोणतीही पूर्वकल्पना न देता दादांनी एंट्री केल्याने संयोजकही गडबडले.
परंतु, कोणताही बडेजाव न बाळगता दादांनी बालकलाकारांशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यांच्याशी गप्पा मारल्या. मीही शिबिरांमध्ये जात होतो, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिबिरे, त्यांतील बौद्धिके, देशभक्तिपर गीते, खेळ यांची माहिती देताना दादा जुन्या आठवणींमध्ये रमून गेले. यावेळी या मुलांनी सादर केलेल्या मुक्त अभिनयाला त्यांनी रोख बक्षीसही दिले. या गप्पा संपतानाच त्यांनी माईक हातात घेतला आणि थेट कोळीगीतच म्हणायला सुरुवात केली.
यावेळी शिल्पा माजगावकर, विजय टिपुगडे, अभिनेते संजय मोहिते, अॅड. दिलशाद मुजावर, संजय मुंगळे, राजश्री खटावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
...अन् बालचमूंचे पाय थिरकले
दादांचे कोळीगीत सुरू झाल्यानंतर उपस्थित सर्वांनीच टाळ्यांचा ठेका धरला आणि बालचमूंचे पाय थिरकायला लागले. संपूर्ण कडवे म्हणून झाल्यानंतर दादा थांबले तेव्हा बालकलाकारांनी ‘वन्समोअर’ची मागणी केली. यानंतर सर्व मुलांसमवेत त्यांनी फोटो काढले आणि एका अनोख्या अनुभवाची शिदोरी घेऊन बालकलाकार घरी परतले.
महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी अभिनयाच्या शिबिरामध्ये गाणे गायला सुरुवात केली आणि बालचमूने त्यांच्या गीतावर ठेका धरला.