चंद्रकांतदादांनी विधानसभेला उभे राहावे; त्यांना ताकद दाखवू : गजानन कीर्तिकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 02:15 PM2017-10-08T14:15:12+5:302017-10-08T15:19:44+5:30
शिवसेना संपवायला निघालेल्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मनमानी इथून पुढे सहन केली जाणार नाही. त्यांनी येणाºया विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरातील एक मतदार संघ निवडून तेथून उभा राहून दाखवावे, त्यावेळी शिवसेना त्यांना आपली ताकद दाखवेल असे थेट आव्हान शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी रविवारी येथे दिला.
कोल्हापूर :शिवसेना संपवायला निघालेल्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मनमानी इथून पुढे सहन केली जाणार नाही. त्यांनी येणा-या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरातील एक मतदार संघ निवडून तेथून उभा राहून दाखवावे, त्यावेळी शिवसेना त्यांना आपली ताकद दाखवेल असे थेट आव्हान शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी रविवारी येथे दिला.
भाजपा जनाधार विकत घेऊन आमच्या मागे जनतेची ताकद असल्याचे चित्र निर्माण करत आहे, अशी खिल्ली उडवित जिल्ह्यात आठ आमदार व एक खासदार निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी केले.
कळंबा रोडवरील अमृतसिध्दी हॉल येथे शिवसेनेच्या कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, गटप्रमुख, अंगीकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकाºयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, सत्यजीत पाटील-सरुडकर, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
शिवसेना संपविण्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्याकडून पावले उचलली आहेत. त्यांच्याकडून शिवसेनेच्या आमदारांना जिल्हा नियोजनमधील निधी न देणे तसेच आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन त्यांच्यावर खोट्या पोलीस केसेस दाखल करणे असे प्रकार होत आहेत. ते थांबविले नाही तर शिवसेना त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा किर्तीकर यांनी दिला.
शिवसेनेच्या पाठबळामुळेच राज्यात भाजपाचे सरकार असून त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील हे राज्याचे मंत्री व पालकमंत्री झाले आहेत हे त्यांनी विसरु नये. असा टोलाही त्यांनी लगावला. जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार असून लोकसभेचा उमेदवार थोडक्यात पराभूत झाला आहे. या माध्यमातून शिवसेनेला जिल्ह्यात ६५ टक्के जनाधार मिळाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जिल्ह्यात किमान आठ आमदार, एक खासदार निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी तयारीला लागावे, असे आवाहन किर्तीकर यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यात किमान १६ आमदार व राज्यात १५० आमदार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत आगामी निवडणूक ही स्वबळावरच लढण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
अरुण दुधवडकर म्हणाले, भाजपाने आयात उमेदवारांवर कोणतीही वल्गना केली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठामपणे सामारी जाईल. संजय पवार म्हणाले, पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या करारी बाण्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका या ठिकाणी भरघोस यश मिळाले आहे. ग्रामपंचायतीवर पक्षा झेंडा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे.