चंद्रकांत जाधव हेच ‘उत्तर’ - कॉँग्रेसची रात्री उशिरा झाली अधिकृत घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 01:13 AM2019-10-03T01:13:39+5:302019-10-03T01:14:38+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार म्हणून उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे नाव निश्चित झाले. जाधव यांना उमेदवारी मिळाली, ...
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार म्हणून उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे नाव निश्चित झाले. जाधव यांना उमेदवारी मिळाली, अशीच चर्चा बुधवारी दुपारनंतर सुरू होती; त्याला अधिकृत दुजोरा बुधवारी रात्री मिळाला. जाधव हे ‘गोशिमा’चे माजी अध्यक्ष असून फौंड्री उद्योजक आहेत. सध्या ते कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष आहेत. मूळचे मंगळवार पेठेतील पाटाकडील तालमीजवळचे राहणारे असून गाजलेले फुटबॉल खेळाडू आहेत.
भाजप-शिवसेना महायुती झाल्यानंतर ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. शिवसेनेने आमदार राजेश क्षीरसागर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. कॉँग्रेसकडून बाजीराव खाडे, दौलत देसाई, सागर चव्हाण यांनी उमेदवारी मागितली होती. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक तर भाजपचे कार्यकर्ते उद्योजक चंद्रकांत जाधव यांनीही कॉँग्रेसकडे उमेदवारी मागितली.
पक्षाचे राष्टÑीय चिटणीस असलेल्या बाजीराव खाडे यांनी थेट प्रियांका गांधी यांच्याकडे धाव घेतली होती. त्यामुळे दोन दिवसांपासून त्यांनाच उमेदवारी मिळणार; असे चित्र होते; परंतु या दोन दिवसांत जिल्हा तसेच राज्य पातळीवरील कॉँग्रेस नेत्यांकडून हालचाली झाल्या. विशेषत: जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूर उत्तरमधील वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर चंद्रकांत जाधव यांच्या नावाचा विचार झाला व त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली.
वसंतराव मुळीक ‘वंचित’कडे?
कॉँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचे कार्यकर्ते वंचित बहुजन महाआघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. परंतु रात्रीपर्यंत तरी हा संपर्क झालेला नव्हता. यापूर्वी ‘वंचित’कडूनच मुळीक यांच्या कार्यकर्त्यांकडे विचारणा झाली होती. त्यामुळे मुळीक यांनी आता ‘वंचित’ची उमेदवारी घ्यावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.
राहुल खंजिरेंना ए/बी फॉर्मचे वाटप
कॉँग्रेस कमिटी कार्यालयात बुधवारी इचलकरंजी मतदार संघातील उमेदवार राहुल खंजिरे यांना पक्षातर्फे ए/बी फॉर्म देण्यात आले. देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अॅड. गुलाबराव घोरपडे यांच्या हस्ते हा फॉर्म देण्यात आला. यावेळी एस. के. माळी, संजय पोवार, रंगराव देवणे, प्रदीप चव्हाण, महंमद शरिफ शेख, किशोर खानविलकर, संपत पाटील उपस्थित होते.