कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 06:00 PM2022-08-12T18:00:19+5:302022-08-12T18:00:53+5:30
पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार
कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप जिल्ह्यासाठी पालकमंत्री नेमण्यात आले नाहीत. यातच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना शासकीय ध्वजारोहण नेमकं कोणाच्या हस्ते होणार याबाबत चर्चा सुरु होत्या. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हानिहाय कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार याचे आदेश जारी केले होते. यात काही तासातच बदल करण्यात आला आहे.
कोल्हापूरमध्ये कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. याआधी जारी करण्यात आलेल्या आदेशात पाटील याच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण होणार होते, तर कोल्हापूरची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर देण्यात आली होती. मात्र, मुख्यंमंत्र्यांनी यात बदल केले. त्यामुळे आता पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये ध्वजारोहण करणार आहेत.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर तब्बल 40 दिवसानंतरही एकनाथ शिंदे सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. अखेर मंत्रिमंडळ विस्तारानंतर 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.