शाईफेक प्रकरणात चंद्रकांतदादांचा संताप, मुश्रीफांचा इव्हेंट! राजकीय नेत्यांचा सार्वजनिक व्यवहार

By विश्वास पाटील | Published: December 15, 2022 11:52 PM2022-12-15T23:52:15+5:302022-12-15T23:54:22+5:30

मंत्री पाटील यांना भावनेच्या भरात जे मनात येईल ते मोकळेपणाने बोलायची सवय आहे.

Chandrakant Patil anger in the ink throw case, Hasan Mushrif's event! Public affairs of political leaders | शाईफेक प्रकरणात चंद्रकांतदादांचा संताप, मुश्रीफांचा इव्हेंट! राजकीय नेत्यांचा सार्वजनिक व्यवहार

शाईफेक प्रकरणात चंद्रकांतदादांचा संताप, मुश्रीफांचा इव्हेंट! राजकीय नेत्यांचा सार्वजनिक व्यवहार

googlenewsNext

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेला संताप महाराष्ट्राने पाहिला.. तशीच शाई बुलढाण्याचे पालकमंत्री असताना दिव्यांग संघटनेच्या व राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याने हसन मुश्रीफ यांच्यावरही ओतली होती. परंतु त्यांनी त्याचा इव्हेंट केला..त्याची उतराई म्हणून कार्यकर्त्यांना सांगून चक्क कोल्हापूरच्या शासकीय विश्रामधामच्या आवारात दुधाने अभिषेक घालून घेतला.. कोणता विषय कितीपर्यंत ताणवायचा याचे भान राहिले नाही की कसे आपलेच कसे हसू होते, याचेच प्रत्यंतर शाई फेक प्रकरणानंतर मंत्री पाटील यांना अनुभवास आले.

मंत्री पाटील यांना भावनेच्या भरात जे मनात येईल ते मोकळेपणाने बोलायची सवय आहे. कोल्हापुरातही एकदा पत्रकारांना ते कॉलरला टॅग लावले आहेत, असे म्हणाले होते. पैठणच्या भाषणात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मोठेपण सांगताना त्यांनी भीक शब्द वापरला. तो महापुरुषांच्याच बाबतीतच नव्हे तर सामान्य कार्यकर्त्याच्याबाबतीत जरी वापरला असता तरीही कुणाला तो आवडला नसता. त्याचे पडसाद म्हणून शाई फेक झाली. त्यानंतर तर त्यांचा समतोलच ढळला. 

राज्यातील अत्यंत जबाबदारी मंत्री व पुण्याचे पालकमंत्री असतानाही पोलिस ठाण्याच्या दारात उपोषणास बसणार म्हणून त्यांनी जाहीर केले. पत्रकारास अॅगल कसा मिळाला यावरूनही त्यांचा संताप झाला. त्यानंतर आमदार रोहित पवार, आमदार नाना पटोले यांच्याबद्दलही ते इतक्या त्र्याग्याने बोलले की त्यातून त्यांचा बॅलेन्स गेल्याचे महाराष्ट्राने पाहिले. एवढे झाल्यानंतर रात्री एकदमच मलूल आवाजात सगळ्याच प्रकरणावर त्यांनी पडदा टाकला. त्यातून मंत्री पाटील हे वारंवार काहीही बोलतात व नंतर माफी मागतात, अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. 

राजकीय जीवनात त्यांना व पक्षालाही ती हानिकारक ठरणारी आहे. याउलट त्यांच्याच जिल्ह्यातील नेते व राजकीय विरोधक असलेल्या माजी मंत्री मुश्रीफ यांनी मात्र अशा प्रकरणात अगा कांही झालेचि नाही, अशी भूमिका घेऊन त्या प्रकरणांचाही स्वत:च्या प्रतिमानिर्मितीसाठी अत्यंत खुबीने वापर करून घेतला. शाई फेकल्यानंतर दुसऱ्यादिवशी त्यांना सिद्धनेर्लीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचे कॅन आणून अभिषेकच घातला. त्याचे व्हिडीओ पद्धतशीर व्हायरल झाले. फोटोही पोहोच झाले. कार्यकर्ते प्रेमापोटी असे करतात, असे सांगत ते त्याचे समर्थन करत राहिले. त्यांच्या घरावर इन्कमटॅक्सची धाड पडल्यावर बंगल्यासमोर वयोवृद्ध महिलांची झुंबड उडाली. 

मागच्या वर्षी ईडीची कारवाई झाल्यावरही त्यांनी ते प्रकरण पद्धतशीरपणे हाताळले. योग्यवेळी त्याकडे दुर्लक्ष करून ते त्रासदायक ठरणार नाही, असे पाहिले. टोल आंदोलनात ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, गोविंद पानसरे यांनी त्यांच्या कागलच्या घरावर मोर्चा काढल्यावर त्यांनी दारातच मंडप घातला व आंदोलकांना ते स्वत:च चालत भेटायला गेले. मराठा मोर्चावेळीही ते स्वत:हून कार्यकर्त्यांना जाऊन भेटले. बेलेवाडीत प्रदूषणाच्या प्रश्नांवरून महिलांनी आंदोलन केल्यावर तो विषयही त्यांनी कुशलतेने हाताळला.

जेजमेंट महत्त्वाचेच..
सार्वजनिक जीवनात कोणता विषय किती ताणायचा आणि किती अलगदपणे सोडून द्यायचा याचे त्यांच्याइतके जेजमेंट अनेक नेत्यांना नाही. गटातटाच्या टोकाच्या अस्मिता असलेल्या कागल मतदार संघात ते राजकीयदृष्ट्या यशस्वी होण्यात त्यांचे हे राजकीय व्यवस्थापन कारणीभूत असल्याचे ठळकपणे दिसते..

Web Title: Chandrakant Patil anger in the ink throw case, Hasan Mushrif's event! Public affairs of political leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.