अमृतमहोत्सवी ग्रंथालयांना पाच लाख रुपयांचे अनुदान, चंद्रकांत पाटलांची घोषणा
By पोपट केशव पवार | Published: September 10, 2023 05:14 PM2023-09-10T17:14:47+5:302023-09-10T17:15:01+5:30
राज्यातील ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ग्रंथालयांना पाच लाख रुपये तर ५० वर्षे पूर्ण केलेल्या ग्रंथालयांना ३ लाख रुपये अनुदान देणार.
कोल्हापूर : राज्यातील ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ग्रंथालयांना पाच लाख रुपये तर ५० वर्षे पूर्ण केलेल्या ग्रंथालयांना ३ लाख रुपये अनुदान देणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात केली. येथील करवीर नगर वाचन मंदिराच्या (कनवा) विस्तारित इमारतीचे लोकार्पण मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ग्रंथालय भारतीचे अध्यक्ष राजशेखर बालेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, अ व ब वर्ग ग्रंथालयांसाठी आकृतीबंध आराखडा तयार करणार असून, त्यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार आहे. ग्रंथालयांना ६० टक्के अनुदान दिले आहे. त्यांच्या पुढील टप्प्यातील अनुदानाच्या मागण्याही पूर्ण करू. अनुदान वितरित करताना पारदर्शकता यावी, यासाठी येथून पुढे ऑनलाइन स्वरूपात अनुदान देण्यात येणार आहे.यावेळी राजशेखर बालेकर, ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी ‘कनवा’च्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी नितीन वाडीकर, विजय पाटणकर या देणगीदारांचा सत्कार केला. शंभर वर्षे पूर्ण झालेल्या राज्यातील १९ ग्रंथालयांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर विभाग संघचालक प्रतापसिंह कुलकर्णी-दड्डीकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, ‘कनवा’चे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, दीपक गाडवे, नंदकुमार मराठे उपस्थित होते.
महाराष्ट्राला ४७० कोटी मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रंथालयांना पाच हजार कोटी रुपये देण्याचे नियोजन केले आहे. यातील ४७० कोटी महाराष्ट्राला मिळणार आहेत. यातून प्रत्येक ग्रंथालयाला ४ लाख रुपये मिळतील, असेही पाटील यांनी सांगितले. जिल्हा नियोजनच्या निधीतून पुस्तके खरेदी करण्यासाठी वाचनालयांना निधी मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहे. याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून तसा अध्यादेश लवकरच काढू, अशी ग्वाहीही मंत्री पाटील यांनी दिली.