खानापुरात चंद्रकांत पाटील यांना धक्का, आबिटकर यांची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 AM2021-01-19T04:25:32+5:302021-01-19T04:25:32+5:30
खानापूर हे चंद्रकांत पाटील यांचे गाव असल्याने येथील निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपप्रणित स्थानिक आघाडीत ...
खानापूर हे चंद्रकांत पाटील यांचे गाव असल्याने येथील निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपप्रणित स्थानिक आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या गटाचा समावेश होता. त्यांच्याविरोधात आमदार प्रकाश आबिटकर गट रिंगणात होता. आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या निवडणुकीकडे लक्ष दिले होते. निवडणूक काळात ते सातत्याने आढावा घेत होते. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे नेतृत्व भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत, काँग्रेसचे भुजंगराव मगदूम, सुनील मांगले, संदीप पाटील, संजय रेडेकर यांनी केले, तर आमदार प्रकाश आबिटकर गटाचे नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बी. डी. भोपळे, राजू पाटील मानसिंग दबडे, अशोक वारके यांनी केले.
राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी आघाडी झाली असली तरी, खानापूर ग्रामपंचायतीत थोडासा विरोधाभास असणारी आघाडी अस्तित्वात आली होती. मागील पंचवार्षिक निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांचीच सत्ता होती. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर गटाने सत्ता खेचून घेण्यासाठी कंबर कसली होती. आमदार पाटील विरुध्द आमदार आबिटकर, असे रणांगण तापलेले होते.
सोमवारी निकालानंतर आमदार आबिटकर गटाचे सहा, तर विरोधी आघाडीच्या भाजपचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक असे तीन सदस्य निवडून आले.