चंद्रकांत पाटील यांना सहकार कळलाच नाही : हसन मुश्रीफ यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:11 PM2020-10-10T12:11:47+5:302020-10-10T12:13:47+5:30
chandrkantpatil, hasanmusrif, kolhapurnews राज्य बँकेच्या आरोपाबाबत पोलिसांनी योग्य तोच अहवाल पाठविला असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे टीका करीत आहेत. तीन वर्षे सहकारमंत्री म्हणून काम करूनही त्यांना सहकार कळलाच नसल्याचा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.
कोल्हापूर : राज्य बँकेच्या आरोपाबाबत पोलिसांनी योग्य तोच अहवाल पाठविला असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे टीका करीत आहेत. तीन वर्षे सहकारमंत्री म्हणून काम करूनही त्यांना सहकार कळलाच नसल्याचा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना सहकारच काय; बांधकाम, महसूल खातेही समजले नाही. त्यांनी पाच वर्षे राज्य बँक व जिल्हा बँकेच्या चौकशीत घालवली. घोटाळा म्हणजे काय, हे त्यांनी समजावून घ्यावे. राज्य बँकेने सर्व थकीत कर्जे वसूल केली आहेत. बँक एक हजार कोटींच्या नफ्यात आहे. चुकीचा कारभार नसल्यानेच चौकशीत खरे समोर आले. मात्र पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याआधी सहकाराचा अभ्यास करावा.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, आदी उपस्थित होते.
आपत्ती निवारणमधून २५ कोटी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ६० कोटीची मागणी केली होती. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरला पैसे कमी मिळाले असले तरी येत्या आठ-दहा दिवसांत राज्य आपत्ती निवारण कार्यक्रमातून २५ कोटी येतील, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
खासगी दवाखान्यांना हिशेब द्यावा लागेल
कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर खासगी दवाखान्यांनी लूट केल्याच्या तक्रारी आल्या. खासगी दवाखान्यांनी नुसत्या नोटा छापू नयेत, माणुसकीही जिवंत ठेवावी. एक ना एक दिवस त्यांना हिशेब द्यावा लागेल, असा इशारा मंत्री मुश्रीफ यांनी दिला.
मदने, शिंदे झाकलेली माणके
घोडावत कोविड सेंटरचे डॉ. मदने व कागल सेंटरचे डॉ. शिंदे हे चार महिने घरीच गेलेले नाहीत. ही झाकलेली माणके असून त्यांना उजेडात आणले पाहिजे, असे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी सीपीआर व्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त केली.