चंद्रकांत पाटील माझ्या नादाला लागू नका, सगळ्या भानगडी बाहेर काढू; सतेज पाटलांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:35 AM2022-03-26T11:35:58+5:302022-03-26T11:36:40+5:30
चंद्रकांत पाटील यांनी व्यक्तिगत टीका-टिप्पणी करू नये, त्यांनी पुन्हा टीका केली तर मीही यादवापासून दिवाणजीपर्यंतच्या सगळ्या भानगडी बाहेर काढू, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.
कोल्हापूर : उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील यशाने भाजपाच्या नेत्यांना उन्माद आला असून त्यातूनच वाटेल ते बडबडत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझ्या नादाला लागू नये, अन्यथा यादवापासून (चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असताना विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव) दिवाणजीपर्यंतच्या (दिवाणजी म्हणून प्रसिद्ध असलेले तलाठी प्रकाश शिंदे) सगळ्या भानगडी बाहेर काढू, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
मंत्री सतेज पाटील म्हणाले, चंद्रकांत जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. वास्तविक छत्रपती ताराराणीच्या भूमीतून पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून देण्याची संधी कोल्हापूरकरांना आली असताना चंद्रकांत पाटील यांच्या हट्टापायी ही निवडणूक लागली आहे.
ठीक आहे, लोकशाही मार्गाने त्याला सामोरे जाणे अपेक्षित होते. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच लढाई आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जयश्री जाधव यांच्या विजयासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप समजू शकतो. मात्र, व्यक्तिगत टीका-टिप्पणी करणे हे चंद्रकांत पाटील यांना शोभत नाही.
डी. वाय. पाटील ग्रुपची बदनामी त्यांनी सुरू केली आहे. डी. वाय. पाटील ग्रुपने साडेचार हजार जणांना नोकऱ्या दिल्या, त्यांची कुटुंबे उभे केली. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून लाखाे रुग्णांवर उपचार केले. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी व्यक्तिगत टीका-टिप्पणी करू नये, त्यांनी पुन्हा टीका केली तर मीही यादवापासून दिवाणजीपर्यंतच्या सगळ्या भानगडी बाहेर काढू, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.
चंद्रकांत पाटील यांच्या चिठ्ठीवर अडमिशन
डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने अनेकांना मदत केली आहे. माझ्यावर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनीही अनेक वेळा ॲडमिशन करून घेतली आहेत. आता त्याची यादी माझ्याकडे नाही, असल्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवत नसल्याचा टोला मंत्री सतेज पाटील यांनी लगावला.