राजकारणात चंद्रकांत पाटील अज्ञानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:45 AM2018-04-09T00:45:39+5:302018-04-09T00:45:39+5:30
कोपार्डे : ‘भोगावती’च्या दोन माजी उपाध्यक्षांच्या भाजप प्रवेशावेळी त्यांचेच विरोधक पी. एन. पाटील यांचे त्याच व्यासपीठावर गोडवे गाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले राजकारणातील अज्ञान दाखवून दिले, अशी टीका करीत ‘सत्ता येते, जाते; फार दिवस चालत नाही. गोरगरिबांची सेवा करावी लागते, याचे भान ठेवावे,’ असा इशाराही राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.
बालिंगे (ता. करवीर) येथे करवीर तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार व शेतकरी मेळाव्यात ते रविवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या निधनानंतर करवीर तालुक्याकडे दुर्लक्ष झाल्याने कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले, ही वस्तुस्थिती असली तरी आगामी काळात हा बॅकलॉग भरून काढला जाईल. करवीरला वजा करून येथून पुढे जिल्ह्णाचे राजकारण करणार नसल्याची शपथ त्यांनी यावेळी घेतली. शिवसेना-भाजपकडे राज्य करण्याची धमक नाही. राज्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे. कर्जमाफीतून शेतकऱ्यांची थट्टा केली असून, हे सरकार भिकारडे बनले आहे. व्यापाºयांवर अन्याय सुरू आहे, तरुण बेरोजगार आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे नाहीत. शाळा उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांपासून सर्वच मंत्र्यांची मस्तीची भाषा आहे.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ताकद कमी असतानाही मधुकर जांभळे यांनी राष्टÑवादी जिवंत ठेवण्याची धडपड कायम ठेवली आहे. सर्वच नेते त्यांच्यामागे ठाम उभे राहतील. माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, युतीच्या राजकारणात झालेला अन्याय सहन करीत ‘करवीर’मधील कार्यकर्त्यांनी राष्टÑवादी मजबूत करण्याचे काम केले. आगामी काळात आघाडी की बिघाडी हे माहीत नाही; पण जर स्वबळावर लढायची वेळ आली तर ‘करवीर’मधून मधुकर जांभळे हे आमचे उमेदवार असतील. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, सर्वच निवडणुकांत करवीरमधील कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. आगामी काळात मुश्रीफ ताकद देतील.
जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी खासदार निवेदिता माने, तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल रामराजे कुपेकर यांचा सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष राजेश लाटकर, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संगीता खाडे, रघुनाथ जाधव, राजाराम कासार, दत्ता गाडवे, सुनील कारंडे, शंकर पाटील, सुरेश पाटील, जी. डी. पाटील, राजश्री पाटील, तेजस पाटील, सुनील पाटील, रंगराव ढेरे, संभाजी पाटील, विश्वनाथ पाटील, आदी उपस्थित होते. किरण पाटील यांनी आभार मानले.
मुश्रीफांच्या नेतृत्वाखालीच काम
भाजपवर टीकास्त्र सोडत, गेल्या चार वर्षांत मतदारसंघात साडेसहा हजार कोटींची कामे खेचून आणल्याचे सांगत खासदार महाडिक म्हणाले, जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता केली आहे. आगामी काळात हसन मुश्रीफ यांच्याच नेतृत्वाखाली राष्टÑवादी बळकट करण्याचे काम करू.