पंचायत समिती सदस्यांच्या मानधनासाठी प्रयत्न करू - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 03:07 PM2019-09-06T15:07:15+5:302019-09-06T15:18:49+5:30

सर्वसामान्य हिताच्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पंचायत समिती सदस्यांनी नीट पोहचवाव्यात, असे चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

chandrakant patil inaugurate new building of kagal panchayat samiti | पंचायत समिती सदस्यांच्या मानधनासाठी प्रयत्न करू - चंद्रकांत पाटील

पंचायत समिती सदस्यांच्या मानधनासाठी प्रयत्न करू - चंद्रकांत पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देपंचायत समिती सदस्यांना मानधन सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल याबाबत उद्याच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. सर्वसामान्य हिताच्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पंचायत समिती सदस्यांनी नीट पोहचवाव्यात, असे चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.  कागल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले.

कोल्हापूर - पंचायत समिती सदस्यांना मानधन सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल याबाबत उद्याच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. सर्वसामान्य हिताच्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पंचायत समिती सदस्यांनी नीट पोहचवाव्यात, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

कागल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते आज झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ हे होते. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, खासदार संजय मंडलिक, शिक्षण अर्थ समितीचे सभापती अंबरिषसिंह घाटगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, माजी आमदार संजय घाटगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचायत समितीचे उपसभापती विजय भोसले यांनी सर्वांचे स्वागत तर सभापती राजश्री माने यांनी प्रास्ताविक करून विविध मागण्या केल्या. मंडलिक यावेळी म्हणाले, पुढच्या काळात पंचायत समित्या बळकट व्हाव्यात यासाठी प्रयत्‍न करायला हवा. संभाव्य आपत्ती डोळ्यासमोर ठेवून त्याबाबत नियेाजन करावे लागेल. प्रत्येक तालुक्यात बोटी घेता येतील का असा विचारही करावा लागेल. कागल पंचायत समितीने लोकाभिमुख काम केले आहे. 

लोकशाहीमध्ये राज्य कस चालवाव याचा बारकाईने विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली. सर्वसामान्य माणसापर्यंत राज्याच्या, जिल्ह्याच्या विविध योजना पोहचविण्यासाठी पंचायत राजला यशवंतराव चव्हाण यांनी चालना दिली. गावासाठी लागणाऱ्या विविध गोष्टींची निर्मिती, विकास गावची माणसं करतील. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थेट ग्रामपंचायतींना निधी देण्याचा विचार केला. 

ज्याप्रमाणे सभापती, उपसभापती यांना मानधन आहे त्याप्रमाणे पंचायत समिती सदस्यांना मानधन मिळायला हवं. त्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. सरपंचांच मानधन 5 हजार रूपये केले आहे. कोतवाल, पोलीस पाटील यांचेही मानधन वाढवलं आहे. तसेच मानधन पंचायत समिती सदस्यांनाही मिळावे यासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर त्यांना विकास निधी देण्याबाबतही विचार करू, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

नाविन्यपूर्ण योजनेतून नुतन इमारतीवर सौरउर्जा बसविण्यात येईल असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, जुन्या इमारतीच्याबाबत काय करता येईल याबाबत विचार करून आराखडा सांगावा. त्यासाठीही प्रयत्न करू. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेअंतर्गत  शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार मिळणार आहेत. पतीच्या निधनानंतर पत्नीलाही हे मानधन मिळणार आहे. आयुष्यमान कार्ड असल्यास 5 लाखापर्यंतची आरोग्य सेवा मोफत मिळणार आहे. शासनाच्या अशा विविध सर्वसामान्यांच्या फायद्याच्या योजना पंचायत समिती सदस्यांनी नीट लोकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत. पूरग्रस्त भागात जी घरे पूररेषेत येत असतील तिथे सीएसआरमधून घरे बांधून दिली जातील. शासनाच्या योजनेमधून पूररेषा सोडून पर्यायी जागेत घरे बांधून देण्यात येणार आहेत. पूररेषेत येणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतरासाठी मन वळविले पाहिजे. शिरोळ तालुक्यातील राजापूर गावात सीएसआरमधून घरे बांधून देण्याचा पहिला प्रयोग सुरू केला आहे. या आपत्तीने राजकारण, हेवेदावे,मतभेद हे क्षणभंगूर आहे, हे दाखवून दिलं आहे. प्रेमाने वागण्यासाठी आपल आयुष्य खर्ची घातलं पाहिजे,असेही ते शेवटी म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात मुश्रीफ म्हणाले, पंचायत समितीला अधिकार देण्यासाठी घटनेत दुरूस्ती करावी लागेल. त्यासाठी प्रयत्न करावा. कागल तालुक्यातील आपत्तीग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी पक्की घर बांधून देण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी हात सैल सोडून सहकार्य करावे. पंचायत समितीची नुतन वास्तू तालुक्याच्या वैभवात भर घालणारी आणि सर्वसामान्य लोकांना आधार देणारी आहे. या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषदस सदस्य मनोज फराकटे, युवराज पाटील, शिल्पा खोत, शिवानी भोसले, पंचायत समिती सदस्य अंजना सुतार, विश्वास कुराडे, जयदिप पोवार, मुरगूड नगराध्यक्ष राजेखान जमादार आदींसह विविध अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Web Title: chandrakant patil inaugurate new building of kagal panchayat samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.