कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती
By संतोष.मिठारी | Published: September 3, 2022 08:18 PM2022-09-03T20:18:54+5:302022-09-03T20:20:06+5:30
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरुवातीला आठवड्यातील पाच दिवस राहील.
संतोष मिठारी
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : मुंबई विमानतळावरील सकाळच्या सत्रातील वेळ (स्लॉट) मिळण्याबाबतचा मार्ग खुला झाल्याने आता कोल्हापूर- मुंबई विमानसेवा दि. ५ ऑक्टोबरपासून सुरू होईल. सकाळी दहा वाजता कोल्हापुरातून विमानाचे उड्डाण होईल. ही सेवा देण्यास दोन कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे दसरा, नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी मुंबईकरांना चांगली भेट या सेवेच्या माध्यमातून मिळणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे दिली.
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण आणि सेवेबाबतच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलादमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी आढावा बैठक घेतली. त्यातील चर्चेनंतर मंत्री पाटील यांनी कोल्हापूर-मुंबई विमानसेवेची माहिती दिली. मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन असणाऱ्या अदानी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत कोल्हापूर-मुंबई सेवेसाठी सकाळी वेळ उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. मुंबईबरोबरच बंगळुरूची विमानसेवा पूर्ववत सुरू होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. दरम्यान, विमानतळ विस्तारीकरणासाठी ६४ एकर भूसंपादनाची प्रक्रिया जलद पूर्ण करा. पॉवर ग्रीड काॅर्पोरेशन ऑफ इंडियाच्या एचटी लाईनचे शिफ्टिंग, टर्मिनल बिल्डिंगचे डिझाईन करताना ग्रीन बिल्डिंग होण्यावर भर द्या. विमानतळ विस्तारीकरणांतर्गत नेर्ली- तामगाव पर्यायी मार्ग लवकर करा, अशी सूचना केंद्रीयमंत्री सिंदिया यांनी केल्या. विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनी विस्तारीकरणाच्या कामांची माहिती दिली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, माजी खासदार संभाजीराजे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रादेशिक कार्यकारी संचालक जे. टी. राधाकृष्णन, कार्यकारी संचालक जी. प्रभाकरन, आदी उपस्थित होते.
आठवड्यातून पाच दिवस सेवा
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरुवातीला आठवड्यातील पाच दिवस राहील. स्टार आणि अलायंस एअर या कंपन्यांना दोन स्वतंत्र स्लॉट मिळाले आहेत. त्यामुळे रोज दोन विमानांचे उड्डाण होईल. कोल्हापूर-गोवा नवीन मार्गावर सेवा सुरू करण्याची मागणी केली असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.