चंद्रकांत पाटील यांच्यामुळे कोल्हापूरला प्रथमच प्रदेशाध्यक्षपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:01 AM2019-07-17T11:01:24+5:302019-07-17T11:02:21+5:30
राज्य मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे मंत्री अशी राजकीय ताकद असलेल्या महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोल्हापूरला प्रथमच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. कोल्हापूरचे जावई असलेले अमित शहा हे भाजपचे देशाचे अध्यक्ष असून, मंत्री पाटील यांच्या निवडीने एक सुखद योगायोग जुळून आला आहे.
विश्र्वास पाटील
कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे मंत्री अशी राजकीय ताकद असलेल्या महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोल्हापूरला प्रथमच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. कोल्हापूरचे जावई असलेले अमित शहा हे भाजपचे देशाचे अध्यक्ष असून, मंत्री पाटील यांच्या निवडीने एक सुखद योगायोग जुळून आला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या यशात मंत्री पाटील यांनी लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्यामुळेच त्यांना ही सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली. हे पद मिळाल्याने त्यांचे मुख्यमंत्रिपदाच्या वाटचालीत एक पाऊल पुढे पडले. कोल्हापूरला यापूर्वी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून श्रीपतराव शिंदे यांना संधी मिळाली होती. माजी खासदार जयवंतराव आवळे हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते.
भुदरगड तालुक्यातील गिरणी कामगाराचा किटलीबॉय असलेला मुलगा ते राज्यातील दोन नंबरचा मंत्री व आता प्रदेशाध्यक्ष अशी मंत्री पाटील यांची राजकीय वाटचाल आहे. ते सध्या कोल्हापूर व पुण्याचे पालकमंत्री आहेत. यापूर्वी त्यांनी जळगावचे पालकमंत्रिपदही सांभाळले. त्यांनी कृषी आणि मदत व पुनर्वसन ही खातीही सांभाळली आहेत. विधानसभा निवडणूक होईपर्यंत रावसाहेब दानवे यांच्याकडेच हे पद राहील, अशी शक्यता होती; परंतु पक्षाने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी दिली.
पाटील यांना ही संधी मिळण्यात दोन-तीन महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. मंत्री पाटील यांची जडणघडण ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत झाली आहे. त्यामुळे संघातूनही त्यांना कायमच बळ मिळाले आहे. गेल्या साडेचार वर्षांत त्यांच्याकडे महत्त्वाची व मोठी आर्थिक उलाढाल असलेली मंत्रिपदे असून त्यांच्याबद्दल फारशी तक्रार झालेली नाही.
आता जरी रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष होते तरी डॉ. सुजय विखे, रणजित निंबाळकर यांच्यापासून ते रंजना कूल यांच्यापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांना भाजपमध्ये आणण्यात व त्यांना विश्वास देऊन पक्षात त्यांचा सन्मान करण्यात मंत्री पाटील यांचा वाटा महत्त्वाचा राहिला. मंत्री पाटील यांच्या डोक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद कशी वाढवायची, याचे आडाखे सतत सुरू असतात. त्याचा पक्षालाही नक्कीच फायदा झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर विधानसभेलाही चांगले यश मिळविण्याचे पक्षाचे प्रयत्न आहेत. ही निवड त्या घडामोडींचाच भाग मानली जाते. या पदासाठी भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांचेही नाव चर्चेत होते; परंतु त्यांची पश्चिम महाराष्ट्र सोडून अजून तेवढी ओळख प्रस्थापित झालेली नाही. मंत्री पाटील यांची ओळख मात्र आता राज्यभर झाली असल्याने तीदेखील त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली.
मराठा आरक्षणप्रश्नी महत्त्वाची भूमिका
मंत्री पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोन सत्ताकेंद्रे होण्याची भीती नाही. ‘साधा कार्यकर्ता असो, आमदार असो की मंत्री. मी म्हणजे कोरे पाकीट आहे. पक्ष त्यावर जे लिहील त्यानुसार माझी वाटचाल राहील,’ असे ते कायम सांगत असतात.
मराठा आरक्षण आंदोलन असो किंवा शिवसेनेबरोबरचा समन्वय असो; त्यांनी यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. विधानसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षण लागू केल्याचा राजकीय फायदा भाजप नक्कीच उठविणार आहे. त्या दृष्टीनेही मराठा समाजातील नेत्यास पक्षाची संघटनात्मक जबाबदारी दिली असण्याची शक्यता आहे.