कोल्हापूरचा भ्रमनिरास केल्यानेच चंद्रकांत पाटील यांना घरी बसविले : मुश्रीफ यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:49+5:302020-12-27T04:18:49+5:30
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या सरकारमध्ये दोन नंबरचे मंत्री असतानाही त्यांनी कोल्हापूरच्या जनतेचा भ्रमनिरास केल्यामुळेच ...
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या सरकारमध्ये दोन नंबरचे मंत्री असतानाही त्यांनी कोल्हापूरच्या जनतेचा भ्रमनिरास केल्यामुळेच त्यांना जनतेने घरी बसविले असल्याचा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी लगावला. आता कोल्हापुरात येऊन ते काय करणार आहेत हे त्यांनाच माहीत, परंतु तरीही त्यांच्या येण्याचे मी स्वागत करतो, अशीही खिल्ली मुश्रीफ यांनी उडविली आहे.
पुण्यात गुुरुवारी (दि. २४) आमदार पाटील यांनी आपण कोल्हापूरला परत जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याबद्दल पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी टीका केली. ते म्हणाले, अत्यंत हास्यास्पद विधाने करण्याची आमदार पाटील यांना सवयच लागून गेली आहे. मध्यंतरी त्यांनी कोल्हापुरातील कोणत्याही मतदार संघातून निवडून येऊ शकतो, अशी आरोळी दिली; परंतु सध्या जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसताना जे सत्यात येणार नाही, त्याची घोषणा त्यांनी केली. त्यांना कोथरूडच्या जनतेने निवडून दिले. आता त्यांना वाऱ्यावर सोडून ते परत कोल्हापूरला येतो म्हणत आहेत. हा तेथील मतदारांचा विश्वासघात आहे. पदवीधर मतदार संघात त्यांनी काहीच काम न केल्याने तिथेही त्यांच्या पक्षाचा सपाटून पराभव झाला. जेव्हा महत्त्वाची सत्ता होती, तेव्हा ते कोल्हापूरसाठी काहीच करू शकले नाहीत, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.