'माझे वडील ५० वर्षं मर्सिडीजमधून फिरताहेत, हवं तर बॅलन्स शीट देतो!'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 11:44 AM2020-01-17T11:44:16+5:302020-01-17T11:45:56+5:30
गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे काहीही प्रश्न सुटले नाहीत. निधी मिळाला नाही.
कोल्हापूर : शिरोलीकरांचे ऐकूनच चंद्रकांत पाटील नेहमी अडचणीत येतात, असा टोला लगावतानाच पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘माझे वडील डी. वाय. पाटील गेली ५० वर्षे मर्सिडीज गाडीतून फिरतात. तुम्हा पाहिजे तर बॅलन्स शीट देतो,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी भाजप पदाधिकारी निवडीवेळी ‘फाईव्ह स्टार हॉटेल उभारायला बंटी पाटील यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले?’ अशी विचारणा केली होती. त्याला सतेज पाटील यांनी गुरुवारी प्रत्युत्तर दिले. जिल्हा परिषदेच्या निवडीसाठी पाटील सकाळी कोल्हापुरात आले.
मंत्री पाटील म्हणाले, ज्या कार्यक्रमात माझ्या आणि मुश्रीफ यांच्याविरोधात बोला, अशी चिठ्ठी कुणी दिली, याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे पाटील यांनी पहिल्यांदा शिरोलीकरांचे ऐकणे बंद करायला पाहिजे. माझी खात्रीलायक माहिती आहे की, त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या कुणी त्यांना ही चिठ्ठी दिली आणि आमच्या टीका करायला लावली.
गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे काहीही प्रश्न सुटले नाहीत. निधी मिळाला नाही. काही प्रगती झाली नाही. त्यामुळे सहकारी मंत्री हसन मुश्रीफ आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सहकार्यातून जिल्ह्यासाठी मोठा निधी आणणार आहे. चंद्रकांत पाटील हे सत्ता गेल्यामुळे हवालदिल झाले आहेत.
थेट पाईपलाईनबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकार नाही
मुळात थेट लाईनबद्दल बोलण्याचा चंद्रकांत पाटील यांना काहीही अधिकार नाही, असा आरोप सतेज पाटील यांनी यावेळी केला. ते म्हणाले, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी जर थेट पाईपलाईनचे काम सुरू झाले नाही तर मी निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले होते.
आम्ही योजनेसाठी ४२५ कोटी रुपये मंजूर केले. काम सुरू केले. परंतु चंद्रकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत यासाठी एकही आढावा बैठक घेतली नाही. निधी दिला नाही. काहीही केले नाही. त्यामुळे याबाबत बोलण्याचा त्यांना काहीएक अधिकार नाही.
बॅलन्स शीट पाठवून देतो
आम्ही कधीही वैयक्तिक आरोप केले नाहीत. आम्ही राजकीय आरोप जरूर करतो; परंतु चंद्रकांत पाटील यांनी खालच्या पातळीवर जाऊन आरोप सुरू केले आहेत. आता त्यांना हॉटेल कसे बांधले याचे बॅलन्स शीटच पाठवून द्यावे लागेल. म्हणजे त्यांना कळेल की कुठल्या बॅँकांकडून किती कर्ज घेतले ते. भाजपसारख्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले पाटील गल्लीतील आरोप करताहेत, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला.