पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक : चंद्रकांत पाटील क्लिन बोल्ड होणार : सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 03:40 PM2020-12-01T15:40:13+5:302020-12-01T15:45:47+5:30
Vidhan Parishad Election, Bjp, Satej Gyanadeo Patil, kolhapur पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूकीमध्ये भाजपची हॅट्रीकचा होणार असल्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा फोल ठरणार आहे. या निवडणूकीत ते रनआऊटच नव्हे तर क्लिन बोल्ड होतील, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला.
कोल्हापूर : पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूकीमध्ये भाजपची हॅट्रीकचा होणार असल्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा फोल ठरणार आहे. या निवडणूकीत ते रनआऊटच नव्हे तर क्लिन बोल्ड होतील, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला.
महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री पाटील यांनी मंगळवारी पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पेठेतील दौलतराव भोसले विद्यालय येथे केंद्रास भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील नेहमी राज्यात भाजपचे सरकार स्थापन होणार, महापालिकेत चमत्कार होणार महापौर भाजपचा होणार, पुणे पदवीधरमध्ये भाजपचे उमेदवार निवडून येणार असा दावा करतात. मात्र, त्यांचे दावे नेहमी फोल ठरत असल्याचा आपला अनुभव आहे.
या निवडणूकीत अशीच प्रचिती येणार आहे. कोल्हापुरसह सांगली, सातारा सोलापुर, पुणे येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिन्ही पक्ष ताकदीने उतरले आहेत. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील याची खात्री आहे. या निवडणूकीत महाविकास आघाडीचा विचार रुजवण्याचा प्रयत्न आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारच शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न सोडवू शकतो, हा विश्वास लोकांना या निमित्ताने दिला आहे.