मी टोपी टाकली ती विश्वजितला बसली, चंद्रकांत पाटील यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 02:57 PM2019-07-19T14:57:08+5:302019-07-19T15:01:21+5:30
'माझ्या पक्षात या म्हणून मी कुणाच्याही घरी निमंत्रण घेऊन गेलेलो नाही'
कोल्हापूर : मी टोपी फेकायचे काम केले, ती ज्यांना बसली. त्यांनीच त्याचा खुलासा केला, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजित कदम आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना शुक्रवारी लगावला. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे पक्षाच्या वतीने दसरा चौकात जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, "माझ्या पक्षात या म्हणून मी कुणाच्याही घरी निमंत्रण घेऊन गेलेलो नाही. दोन्ही काँग्रेसची मंडळी अंधारात मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्यांना तुम्ही थांबवा. ज्यांना आपले काय होणार अशी भीती वाटते, असे लोक भाजपामध्ये येण्यास उत्सुक आहेत. हसन मुश्रीफ भाजपामध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे. अल्पसंख्याक समाजातील अत्यंत सहृदयी माणूस आहे. त्यांनी रुग्णसेवा प्रचंड केली आहे. राष्ट्रवादीत राहिले तर त्यांना भवितव्य नाही. कारण पाच वर्षे त्यांचे सरकार काय पुन्हा सत्तेत येणार नाही. तोपर्यंत ते म्हातारे होतील." याचबरोबर, मुळात मी महत्वाकांक्षी अजिबात नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष झालो म्हणून मुख्यमंत्री होतोच असेही काही नाही, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपात आला तर कुणाला आश्चर्य वाटायला नको, असे विधान भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी चंद्रकांत पाटलांना टोला दोन दिवसांपूर्वी लगावला. चंद्रकांत पाटील यांचे विधान हास्यास्पद आहे. पाटील हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत. ते असे विधान का करतात हे त्यांनाच माहित आहे अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली.
(काँग्रेसचे एक प्रदेश कार्याध्यक्ष लवकरच भाजपमध्ये येतील, चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट)