चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची; पदाधिकाऱ्यांचे म्हणणे : पराभवास व्यक्तिगत कोणी जबाबदार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:39 AM2020-12-16T04:39:10+5:302020-12-16T04:39:10+5:30
कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्राम देशमुख यांच्या विजयासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाध्यक्ष ...
कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्राम देशमुख यांच्या विजयासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी अथक परिश्रम घेतले तरीही महाविकास आघाडीच्या युतीमुळे हा पराभव झाला. त्यास व्यक्तिगत कोणीही पदाधिकारी अथवा कार्यकर्ते जबाबदार नाहीत. त्यामुळे राजीनाम्याची मागणी चुकीची असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी स्पष्ट केले.
किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, राहुल देसाई, पृथ्वीराज यादव, सुनील मगदूम, दत्तात्रय मेडशिंगे, हंबीरराव पाटील, प्रवीण प्रभावळकर, संभाजी आरडे, दीपक शिरगावकर, आनंदराव साने, नामदेव पाटील यांनी हे स्पष्टीकरण केले.
पक्षाच्या संस्कृतीप्रमाणे, लोकशाही पद्धतीप्रमाणे हा पराभव आम्ही खिलाडूवृत्तीने मान्य केला आहे. तरीही पेठवडगाव येथील पत्रकार परिषदेत काही माजी पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली व त्यांच्यावर साफ चुकीचे आरोप केले आहेत. जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील म्हणाले, घाटगे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पक्षबांधणी केली. शिवार संवाद, कोविड सेंटरना भेटीतून पक्ष लोकांपर्यंत नेला. जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचे काम चांगले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर १२ दिवसांनी अशा पद्धतीचे आरोप करणाऱ्यांची मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व खोडसाळपणाचे आहेत.
(विश्वास पाटील)