सरकारकडून देशद्रोही कृत्याचे समर्थन, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 12:09 PM2022-03-02T12:09:00+5:302022-03-02T12:09:56+5:30

मुख्यमंत्री ठाकरे, सरकार आणि या सरकारवर नियंत्रण असलेले शरद पवार त्यांचा राजीनामा घेतील असे अपेक्षित होते; परंतु तो घेतला नाही म्हणून आम्हालाही आंदोलन करावे लागत आहे.

Chandrakant Patil's serious allegations against the government for supporting the act of treason | सरकारकडून देशद्रोही कृत्याचे समर्थन, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

सरकारकडून देशद्रोही कृत्याचे समर्थन, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

Next

कोल्हापूर : दाऊद कंपनीशी संबंध ठेवून हसीना पारकर हिची जमीन घेणाऱ्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला. मलिक यांचा राजीनामा घेण्यास असमर्थता दाखविणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार दाऊदच्या देशद्रोही कृत्याचे समर्थन करतेय, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री ठाकरे जोपर्यंत नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत भाजप विधिमंडळात तसेच रस्त्यावरील आंदोलन सुरूच ठेवेल, असा इशारा देताना पाटील म्हणाले की, २३ फेब्रुवारीला मलिक यांना अटक झाली. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी ठोठावली. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे, सरकार आणि या सरकारवर नियंत्रण असलेले शरद पवार त्यांचा राजीनामा घेतील असे अपेक्षित होते; परंतु तो घेतला नाही म्हणून आम्हालाही आंदोलन करावे लागत आहे.

म्हणणे वेगळे..

बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमला पकडून केंद्र सरकारने भारतात का आणले नाही, असा प्रश्न केला असता पाटील यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत; परंतु आंतरराष्ट्रीय कायदे भयंकर कडक आहेत त्यामुळे त्यात अडथळे येत आहेत, असे सांगितले. तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी तर मुसक्या आवळून दाऊदला भारतात आणू असे सांगितले होते, याकडे लक्ष वेधता पाटील यांनी ‘तसे म्हणणे वेगळे आणि प्रत्यक्ष आणणे वेगळे’ असल्याचा खुलासा केला.

पानसरे, दाभोलकर प्रश्नावर निरुत्तर

मंत्र्यांच्या विरोधातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी झटणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा दाभोलकर, पानसरे यांच्या खुन्यांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याकडे लक्ष वेधले असता पाटील यांनी अपयश का येते हे सांगायला मी काही त्या तपास यंत्रणेचा ॲथॉरिटी नाही, असे स्पष्टीकरण दिले.

Web Title: Chandrakant Patil's serious allegations against the government for supporting the act of treason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.