किणे येथील चंद्रकांत शेंदरकर यांची अमेरिकेच्या नासा या संशोधन केंद्रात निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 09:29 PM2024-07-11T21:29:51+5:302024-07-11T21:30:11+5:30
गिरणी कामगाराच्या मुलाने जिद्दीने मिळविले यश
सदाशिव मोरे, आजरा : किणे ( ता.आजरा ) येथील चंद्रकांत विष्णू शेंदरकर यांची अमेरिकेतील जगप्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून अमेरिकेच्या नासा या संशोधन केंद्राच्या प्रकल्पासाठी निवड झाली आहे. सॅटॅलाइट मधून ढगांची निरीक्षण हा त्यांचा प्रकल्प आहे. गिरणी कामगाराच्या मुलाने जिद्दीने मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे.
चंद्रकांतमध्ये लहानपणापासूनच जिद्द व संशोधनात्मक काम करण्याची इच्छा होती. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण दादर येथील साने गुरुजी विद्यालयात, अकरावी व बारावीपर्यंत शाबूसिद्धी कॉलेज भायखळा - मुंबई येथे झाले. वडील गिरणी कामगार असल्याने यादरम्यान ते किरणे या आपल्या गावी आले. त्यानंतर बीएससीचे शिक्षण आजरा महाविद्यालय आजरा तर एमएससीचे शिक्षण शिवाजी विद्यापीठात मॅथॅमिटीक्स या विषयातून झाले. सीडॅकचे शिक्षण गोव्यात घेतले.
शिक्षण घेत असतानाच त्यांची अमेरिकेत प्रसिद्ध असलेल्या जे.पी. मॉर्गन या बँकेत हैदराबाद येथे अधिकारीपदी निवड झाली. नोकरी करीत असतानाच एमआयटीमधून अमेरिकेतील हावर्ड युनिव्हर्सिटीमधून नासाशी संबंधीत संशोधनाचा तीन वर्षाचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्यांची नासा या संशोधन केंद्राच्या प्रकल्पामध्ये निवड झाली आहे. सॅटेलाईटमधून ढगांचे निरीक्षण व वेगवेगळे संशोधन या प्रकल्पामधून केले जाणार आहे.
वडील गिरणी कामगार तर आई गृहिणी असतानाही चंद्रकांतने मिळविलेले यश आकाशाला गवसणी घालणारे आहे. आजरा तालुक्यातून नासा या संशोधन केंद्रामध्ये निवड झालेला चंद्रकांत हा पहिला विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.