चंद्रकांतदादा पुन्हा गरजले... हिंमत असेल तर एकट्याने लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:02 AM2020-12-05T05:02:17+5:302020-12-05T05:02:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : माझे शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसला जाहीर आव्हान आहे की, त्यांनी हिंमत असेल तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : माझे शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसला जाहीर आव्हान आहे की, त्यांनी हिंमत असेल तर आमच्याशी एकएकट्याने लढावे; मात्र या तीन पक्षांत ती हिंमत नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानपरिषदेतील सहा जागांचे कल स्पष्ट झाल्यावर व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रितपणे आमच्याशी लढत दिली. यामुळे या निकालांमध्ये काहीही धक्कादायक असे घडलेले नाही. हे होणारच होते. परंतु, तरीदेखील भाजपने महाविकास आघाडीला कडवी झुंज दिली आहे. निकालांमध्ये मुद्दा असा की, शिवसेनेला काय मिळालं याचा त्यांनी विचार करायला हवा. त्यांची अमरावतीची जागा गेली. याउलट या निकालांमध्ये भाजपला निदान धुळे-नंदुरबार मतदारसंघात विजय मिळविता आला. मात्र शिवसेनेचे काय ? शिवसेनेने अमरावतीची एकमेव जागाही गमावली. पण या निवडणुकीत सर्वाधिक फायदा झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा. त्यांनी पुणे, औरंगाबाद व अप्रत्यक्षरीत्या अमरावती शिक्षक मतदार संघात विजय प्राप्त केला.
आमदार पाटील यांनी पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूक फारच व्यक्तिगत प्रतिष्ठेची केली होती. पदवीधर मतदार संघातून त्यांनी यापूर्वी दोनदा प्रतिनिधित्व केले आहे. त्याअगोदर प्रकाश जावडेकर या मतदार संघातून दोन वेळा निवडून आले. गेल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सारंग पाटील यांनी त्यांना कडवी झुंज दिली होती. भाजपने बूथ पातळीवर नोंदणीपासून अन्य यंत्रणा फार पद्धतशीरपणे राबवली असल्याने आमचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा आत्मविश्वास ते व्यक्त करीत होते. प्रत्यक्षात तो अतिआत्मविश्वासच नडल्याचे निकालाने स्पष्ट केले.