सरकार पडेल म्हणणारे चंद्रकांतदादा कोम्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:35+5:302021-05-29T04:19:35+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवाले कोमात आहेत. गेली अठरा ...
कोल्हापूर : महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवाले कोमात आहेत. गेली अठरा महिने आमचे सरकार सुस्थितीत चालले आहे. आरक्षणावरून मराठा समाजात गैरसमज पसरवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाईने आरक्षण जाहीर करून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेली "सेव्ह मेरीट- सेव्ह नेशन" ही संघटना भाजप आणि आरएसएसशी संबंधित आहे, त्यांच्या संघटनांचे पदाधिकारी आहेत. एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे टिकणार नाही असे आरक्षण द्यायचे, तसेच मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवून आंदोलनासाठी उचकवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा तिहेरी डाव आहे, पण काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
----
बोनस पुढच्या पाच वर्षांत
चंद्रकांत पाटील राज्य सरकार बोनसमध्ये चालले असल्याची टीका केली आहे. सरकार स्थापन झाल्यापासून ते असेच म्हणत आहेत, गेली अठरा महिने राज्य सरकार चांगले चालले आहे, आम्ही पाच वर्षे पूर्ण करू आणि त्याचा बोनस त्यापुढच्या पाच वर्षांत मिळवू ,असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
--
संभाजीराजेंच्या भूमिकेचे स्वागत...
संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून मराठा आरक्षणाबाबत माझं तुझं करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन लढू या, ही भूमिका त्यांनी मांडली. अनेक विधितज्ज्ञांशी चर्चा केली आहे, त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
--