चंद्रकांतदादांचे वर्तन खलनायकासारखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2016 12:57 AM2016-04-04T00:57:14+5:302016-04-04T00:57:14+5:30
हसन मुश्रीफ : पाच कोटींचा निधी परत घेतला; हीणकस राजकारण
कागल : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे माझ्याबरोबर गतजन्मीचे वैर असल्यासारखे वागत आहेत. मात्र, माझ्या पाठीशी सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद असल्याने ते माझे काहीही करू शकणार नाहीत. मात्र, माझ्यासोबत असणाऱ्या लोकांना आणि सामान्य जनतेला पालकमंत्र्यांच्या या डावपेचात बळी पडावे लागत आहे. गडहिंग्लज नगरपालिकेला दिलेला पाच कोटींचा निधी परत घेण्याचा शासनाचा निर्णय हा पालकमंत्र्यांच्या याच मनोवृत्तीतून झाला आहे. ते सिनेमातील खलनायकासारखे वर्तन करीत आहेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी येथे केली.
कागल नगरपरिषदेच्या वतीने शहरातील १२२ अपंगांना प्रत्येकी चार हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान राखीव निधीतून देण्यात आले. यावेळी धनादेश वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गाडेकर होत्या. उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, छावा अपंग संघटनेचे संतोष मिसाळ, आनंदा (आबा) चव्हाण, प्रकाश गाडेकर प्रमुख उपस्थित होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्री हे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे गोरगरीब जनतेचा आणि त्यांचा संबंध आलेला नाही. राजकीय अपयशातून निराश होत ते चुकीचे निर्णय घेत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत गडहिंग्लजच्या सत्ताधारी गटाने मदत केली म्हणून पाच कोटींचा निधी मंजूर करून तो वितरित केला. मात्र, श्रीपतराव शिंदे व आमची युती होऊन गडहिंग्लज कारखान्यात आमचा विजय झाला, म्हणून दिलेले पाच कोटी रुपये परत घेण्याचे हीणकस राजकारण चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. राजकीय द्वेषापोटी कागललाही वगळले आहे.
नगराध्यक्षा गाडेकर यांनी स्वागत केले. प्रकाश गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. भैया माने, मनोहर पाटील यांची भाषणे झाली. यावेळी आशाकाकी जगदाळे, संजय चितारी, सुनील माळी, किरण मुळीक, अंजूम मुजावर, रंजना सणगर, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
न्यायालयात जाऊ... मुख्यमंत्र्यांनाही भेटू...
आ. मुश्रीफ म्हणाले की, दिलेला पाच कोटींचा निधी परत घेतला जाऊ शकतो का? याबद्दल न्यायालयातही जाण्याचा आपला विचार आहे. ‘ज्या गावच्या बाभळी, त्याच गावच्या बोरी’ याप्रमाणे आम्ही पालकमंत्र्यांना यापुढे प्रत्युत्तर देऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबद्दल भेटू. कोल्हापूर जिल्ह्यात यामुळेच भाजप पक्षाला यश मिळू शकलेले नाही हे निदर्शनास आणून देऊ.