‘राष्ट्रवादी’ने पत्नीला उमेदवारी दिली तरी मंडलिकांंचाच प्रचार :चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:17 AM2019-03-05T00:17:41+5:302019-03-05T00:17:47+5:30

मुरगूड : समजा, राष्ट्रवादी काँॅग्रेसने माझ्या बायकोला जरी उमेदवारी दिली तरी आम्ही सकाळी एकत्र चहा-नाष्टा घेऊ पण त्यानंतर मी ...

Chandrika Patil: NCP gives publicity to the wife despite her candidature: Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादी’ने पत्नीला उमेदवारी दिली तरी मंडलिकांंचाच प्रचार :चंद्रकांत पाटील

‘राष्ट्रवादी’ने पत्नीला उमेदवारी दिली तरी मंडलिकांंचाच प्रचार :चंद्रकांत पाटील

googlenewsNext

मुरगूड : समजा, राष्ट्रवादी काँॅग्रेसने माझ्या बायकोला जरी उमेदवारी दिली तरी आम्ही सकाळी एकत्र चहा-नाष्टा घेऊ पण त्यानंतर मी पक्षनिष्ठा आणि युतीधर्म समोर ठेवून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचाच प्रचार करणार, तिथे धनंजय महाडिक कोण, अशी विचारणा भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे जाहीर मेळाव्यात केली. या मेळाव्याच्या निमित्ताने मंडलिक यांच्या निवडणूक प्रचाराचा त्यांनी नारळच फोडला.
येथे नगरपरिषदेच्यावतीने आयोजित विविध विकासकामांचा प्रारंभ झाला. त्यानंतर झालेल्या शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मंडलिक होते. अंबाबाई मंदिराच्या शेजारील सभागृहाच्या बांधकामाचा प्रारंभ, सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ व काही कामांचा लोकार्पण सोहळा मंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. मेळाव्यास महिलांसह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
मंत्री पाटील म्हणाले,‘गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांतदादा काय करणार, याची चर्चा होती. हो, धनंजय महाडिक माझे मित्र आहेत. ते जर शिवसेनेत असते तर आतापेक्षा जास्त राबलो असतो, पण आता संजय मंडलिक यांची उमेदवारी शिवसेनेने जाहीर केल्याने मैत्री वा अन्य नात्यांपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे. त्यामुळे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी संजय मंडलिक यांना लोकसभेत पाठवू. कागलमधील संजय घाटगे व समरजितसिंह घाटगे यांना विधिमंडळात पाठवू. त्यातील कुणाला विधानसभेत व कुणाला विधान परिषदेत पाठवायचे याचा निर्णय लोकसभेनंतर घेऊ. या निवडणुकीत मात्र या दोघांनी मंडलिक यांच्या हातात हात घालून काम करावे.’
संजय मंडलिक म्हणाले ‘ मंत्री पाटील यांनी आपला प्रचार सुरू केला असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवायची आहे. राजकारणात मी नवखा नाही. चांगला राजकीय वारसा आहे. विकासकामे कशी करायची, याचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. धनंजय महाडिक यांनी एक दोनदा निवडणूक लढविल्यावर ते स्वत:ला किंग मानायला लागले आहेत. त्यांच्या पक्षातील लोकच त्यांना मानायला तयार नाहीत. गेल्या पाच वर्षांत हे कोठे होते, भीमा कारखान्याचा पैसा आता लोकसभेच्या निवडणुकीत येणार आहे. व्यापारी पद्धतीने राजकारण करणाऱ्या उपऱ्या लोकांना हद्दपार करण्याचा निर्धार करूया.
महाडिक डमी बसवून पास झाले
पेशाने प्राध्यापक असणारे आणि उच्चशिक्षित असणारे मंडलिक यांच्यावर महाडिक शिक्षणाच्या बाबतीत टीका करत आहेत पण याच महाडिक यांनी बारावीची परीक्षा डमी विद्यार्थ्याला बसवून दिली शिवाय पुढील शिक्षणातही गैरप्रकार करूनच यांनी पदव्या मिळविल्या, अशा डमी खासदारांनी जरा सबुरीने बोलावे; अन्यथा आपली सर्व कृत्ये जाहीर करू, असे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी जाहीर केले.
सतेज पाटील यांची ताकद
कागलमध्ये महत्त्वाचे तिन्ही गट एकत्र आल्याने मंडलिक यांना ९० हजारांचे मताधिक्य मिळेल. भुदरगडमध्ये मी आणि आबिटकर एकत्र आल्याने १० हजारांचे मताधिक्य मिळेल. कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर आणि चंदगडमध्ये आम्ही बरोबरी करू. आमदार सतेज पाटील यांची ताकद सोबतीला आहेच. त्यामुळे मंडलिक लाख मताच्या फरकांनी विजयी होतील आणि विजयी मेळावा मुरगूडलाच घेऊ, असे पालकमंत्री पाटील यांनी जाहीर केले.

Web Title: Chandrika Patil: NCP gives publicity to the wife despite her candidature: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.