चंदूर-कबनूर रस्ता मुख्य स्तराच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:22 AM2021-03-20T04:22:20+5:302021-03-20T04:22:20+5:30
इचलकरंजी : चंदूर-कबनूर (ता. हातकणंगले) हा मुख्य रस्ता दुतर्फा भरणी करून नव्याने करण्यात आला; परंतु दोन स्तराचे काम पूर्ण ...
इचलकरंजी : चंदूर-कबनूर (ता. हातकणंगले) हा मुख्य रस्ता दुतर्फा भरणी करून नव्याने करण्यात आला; परंतु दोन स्तराचे काम पूर्ण झाले. त्यानंतर लॉकडाऊनमुळे तिसरा अंतिम स्तर प्रलंबित आहे. वर्षभरात दोन स्तरांचा रस्ताही ठिकठिकाणी उखडून निघाला आहे. त्यामुळे वाहनधारकांसह ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
चंदूर-कबनूर मार्गावरील रस्ता बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चार वर्षांपूर्वी तुकडे पद्धतीने करण्यात आला होता. त्यानंतर गतवर्षी पूर्ण रस्ता मंजूर झाला. जुना रस्ता उखडून काढून नव्याने रस्ता करण्यात आला. दोन स्तर पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी लॉकडाऊनमुळे काम थांबले. त्यामुळे खरबरीत रस्त्यावरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. अनेकांच्या मोपेड, मोटारसायकली खिळखिळ्या झाल्या, तर काही जणांना कंबरेचा त्रास सुरू झाला. किरकोळ अपघात तर नित्याचेच. त्यात एकाचा अपघाती मृत्यूही झाला.
याबाबत वारंवार मागणी करूनही या रस्त्याकडे शासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावर खड्डे पडले असून, ते चुकविण्याच्या नादातही अपघात होत आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे ताबडतोब रस्ता करावा, अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
या रस्त्यावरून खडतर प्रवास करण्यापेक्षा जुनाच रस्ता बरा होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने न पाहिल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.
जगदीश पाटील, ग्रामस्थ चंदूर
इचलकरंजी शहरालगत असलेल्या या गावामध्ये यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरला आहे. सायझिंगसह मोठमोठे कारखाने असल्याने अवजड वाहनांचीही या मार्गावर वर्दळ असते. त्यात ऊस वाहतुकीमुळे रस्ता उखडला गेल्याने कसरत करत वाहन चालवावे लागते.
किरण होनवाडे, ग्रामस्थ चंदूर
फोटो ओळी
१९०३२०२१-आयसीएच-०२
१९०३२०२१-आयसीएच-०३
चंदूर-कबनूर मार्गावरील दोन स्तर केलेला रस्ताही उखडून गेला आहे.