Kolhapur News: 'चांगभलं'चा गजर, भंडाऱ्याच्या उधळणीत बाळूमामांचा रथोत्सव संपन्न; निढोरीतून रथ आदमापूरकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 06:04 PM2023-03-18T18:04:36+5:302023-03-18T18:04:57+5:30
बाळूमामांनी आपल्या भक्ताकडे सुपूर्द केलेल्या घागरीसह अन्य बग्गीतील दूधाच्या घागरी मानाच्या बैलगाडीतून रथासह आदमापुराकडे रवाना झाल्या
अनिल पाटील
मुरगूड : बाळूमामा भंडारा उत्सवातील आज, रविवारी पार पडणाऱ्या महाप्रसादाकरीता १८ बग्गीतील मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रित करून बाळूमामाच्या रथातून विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्याचा कार्यक्रम निढोरी (ता.कागल) येथे धार्मिक व भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी मुक्त हस्ते भंडाऱ्याची उधळण केली. मानाचे अश्व व मानाच्या बैलजोडी पहाण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.
महाराष्ट्र- कर्नाटकसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापुरच्या संत बाळू मामांच्या भंडारा उत्सवामध्ये आदमापूर येथून २ कि.मी. वर असलेल्या निढोरीत रथ व मानाच्या बैलगाडीतून दुधाच्या घागरी नेण्याचा धार्मिक सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. बाळू मामांच्या भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. हा प्रसाद घेण्यासाठी पहाटे पासून मोठी गर्दी होते. बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर महाप्रसादामध्ये वापरायचे. तीच प्रथा आजही कायम आहे.
राज्य आणि परराज्यातील अनेक भागात राहत असलेल्या बाळूमामांनी जतन केलेली बकऱ्या १८ ठिकाणी बग्गी (दिड ते दोन हजार बक-यांचा कळप)च्या रूपात असतात. प्रथेप्रमाणे भंडाऱ्याच्या निमित्ताने महाप्रसादाच्या आदल्या दिवशी या सर्व बग्गी निढोरीत एकत्र आल्या. या बगीच्या घागरींचे भाविक ग्रामस्थ महिलांनी औक्षण करून स्वागत केले. दरम्यान, आदमापूरातून बाळूमामा देवस्थानच्या रथाचे निढोरीत आगमण झाले. यात्रेसाठी आलेले भाविक वेदगंगेत स्नान करून मारुती देवालयात जमले. येथूनच बाळूमामांनी आपल्या भक्ताकडे सुपूर्द केलेल्या घागरीसह अन्य बग्गीतील दूधाच्या घागरी मानाच्या बैलगाडीतून रथासह आदमापूरकडे रवाना झाल्या.
दर्शनासाठी भाविकांची झुंबड
आकर्षक रथामध्ये बाळूमामांची भव्य चांदीची मूर्ती होती. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. द्वादशी दिवशी म्हणजेच उद्या, रविवारी पहाटे मानाच्या घागरीतून बाळूमामांना दुग्धाभिषेक घालण्यात येणार आहे. उर्वरित घागरीतील मेंढ्यांचे दूध महाप्रसादामध्ये वापरले जाणार आहे. कर्नाटक औरनाळमधून आलेल्या दिंडीतील भाविक भक्त या ठिकाणी थांबून रथाबरोबर पुढे मार्गस्थ झाले.
जेसीबीतून भंडाऱ्याची उधळण
उत्साही भक्तांनी जेसीबीतून भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी मार्गावर नक्षीदार रांगोळी, रंगी- बेरंगी फुलांची पखरण, कीर्तन- प्रवचनाबरोबर टाळ-मृदंगाचा गजर, ढोल- ताशाचा दणदणाट, भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं!' चा जल्लोष करण्यात आला. निढोरीतील सर्व भक्तांना मोफत खिचडी, फळे, ताक व सरबत पुरवण्यात आले.