लोकसहभागातून ‘सीपीआर’ची प्रतिमा बदला

By admin | Published: May 20, 2017 12:35 AM2017-05-20T00:35:26+5:302017-05-20T00:35:26+5:30

चंद्रकांतदादा पाटील : ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’कडून लोकसहभागातून ६१ बेड प्रदान

Change the image of 'CPR' from people's participation | लोकसहभागातून ‘सीपीआर’ची प्रतिमा बदला

लोकसहभागातून ‘सीपीआर’ची प्रतिमा बदला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रुग्णसेवेचे माध्यम असणाऱ्या सीपीआर रुग्णालयातील वातावरण चांगले असणे आवश्यक आहे. केवळ गरीब, सर्वसामान्यांनाच नव्हे, तर समाजातील सर्व घटकांना वैद्यकीय उपचारासाठी उपयुक्त ठरणारा पर्याय म्हणून हे रुग्णालय व्हावे. त्यादृष्टीने कोल्हापूरकरांनी लोकसहभागातून सीपीआरची प्रतिमा बदलण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.
येथील आर्ट आॅफ लिव्हिंगतर्फे श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या जन्मदिवसानिमित्त लोकसहभागातून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास (सीपीआर) ६१ बेड प्रदान करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सीपीआरमधील या कार्यक्रमास ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे स्वामी संतोषजी, आमदार अमल महाडिक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सरकारी योजना आणि आर्थिक मदतीतून रुग्णालयात सर्व सुविधा होतील अशी सर्वांनी अपेक्षा न करता रुग्णालयातील सुधारणांसाठी लोकसहभाग वाढणे गरजेचे आहे. यात सीपीआरला उत्तम दर्जाचे बेड देऊन ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने चांगली सुरुवात केली आहे. सीपीआरची प्रतिमा बदलत असल्याचा आनंद आहे. ती उंचाविण्यासह लोकसहभागातून सीपीआर हे खासगी रुग्णालयाला एक दर्जेदार पर्याय झाले पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपच्या व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष लाड, परिमल नाईक, जयेश ओसवाल, सुहास लटोरे, भैया शेटके, मयूर दवे, मिलिंद पाटील, रोहित साळोखे, राजन पाटील, दादासाहेब तावडे, विजय जाधव, बंटी सावंत, गणेश जाधव, अजित मोरे, आदी उपस्थित होते.


आमदार महाडिक, दुरानींकडून मदतीचा हात
सीपीआरमधील हृदय शस्त्रक्रिया विभागातील अ‍ॅटो ब्लड गॅस अ‍ॅनालायझर (एबीजी) हे यंत्र महिनाभरापासून बंद असणे चुकीचे आहे. याची माहिती रुग्णालय प्रशासनाने तातडीने देणे आवश्यक होते. यापुढे प्रशासनाने दक्ष राहावे आणि मदत हवी असल्यास त्वरित त्याची माहिती द्यावी, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केली. ते म्हणाले, आमदार अमल महाडिक यांनी नव्या आयसीयू कक्षासाठी अद्ययावत सुविधायुक्त १६ बेड दिले आहेत. शिवाय त्यांनी आणि गांधीनगरमधील उद्योगपती शंकर दुलाणी यांनी सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीच्या दोन ‘एबीजी’ यंत्राच्या माध्यमातून सीपीआरला मदतीचा हात दिला आहे.


गरजांची पूर्तता करू
सीपीआरमधील गरजा येथील प्रशासनाने मांडाव्यात, त्या निश्चितपणे सोडविल्या जातील. बेड, यंत्रसामग्री, इमारतीची रंगरंगोटी, डॉक्टरांच्या निवासस्थानांचे नूतनीकरण, आदींबाबतचे प्रस्ताव सादर करावेत. त्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. कोल्हापूर हे अंबाबाईची नगरी असल्याने येथे चांगल्या कामाला मदत कमी पडणार नसल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Change the image of 'CPR' from people's participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.