धोके टाळण्यासाठी मानसिकता बदला
By admin | Published: February 4, 2017 12:40 AM2017-02-04T00:40:34+5:302017-02-04T00:40:34+5:30
राजेंद्रसिंह राणा यांचा सल्ला : जलव्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन
कोल्हापूर : मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला असून, तो अधिक गुंतागुंतीचा व भयानक बनत चालला आहे. भविष्यातील पर्यावरणाचे धोके टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मानसिकतेत बदल करायला हवा, असा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी शुक्रवारी दिला.
येथील प्रा. डॉ. ए. डी. शिंदे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त सायबर महाविद्यालयात आयोजित स्मृती व्याख्यानमालेत ते ‘हवामान बदल समस्येवर पर्याय : जल व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. पी. बी. साबळे होते. यावेळी विश्वस्त डॉ. व्ही. एम. हिलगे, डॉ. पी. एस. राव, डॉ. टी. एम. शिवारे, अॅड. श्रीपतराव शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी अमृतमहोत्सवानिमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचा सत्कार करण्यात आला.
जलतज्ज्ञ राणा म्हणाले, एकविसाव्या शतकात मानवासमोर ऋतुचक्रातील बदल व जागतिक तापमानवाढ या पर्यावरणाच्या प्रमुख गंभीर समस्या असणार आहेत आणि त्यास आपणच जबाबदार आहेत. सध्याची शिक्षणव्यवस्थाही उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचे जास्तीत जास्त शोषण कसे करता येईल, हेच शिकविते. दोनशे वर्षांपूर्वी इथली शिक्षणव्यवस्था मानव आणि निसर्ग यांच्यामधे दुवा साधणारे शिक्षण देणारी होती. ती आता लुप्त झाली आहे. स्वातंत्र्यानंतर दुष्काळ दहापटींनी, तर पूर परिस्थितीत आठपटींनी वाढली आहे. याला आपली जीवनशैलीच जबाबदार आहे. पर्यावरणसंबंधी धोरणे आखतानाही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना आवडतील असे सल्ले देणारेच सल्लागार असल्याने, आपण या परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकलो नाही. आपल्या समाजातही पर्यावरणाबद्दल जागरूकतेचा अभाव आहे. नद्या, नाले यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायद्यांपेक्षा नागरिकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. शिक्षणसंस्था, विद्यापीठांनी फक्त पुस्तकी ज्ञान न देता कृतिशील कार्यक्रमाची आखणी करून लोकशिक्षणाची मोहीम हाती घ्यायला हवी; तरच येणाऱ्या काळातील पर्यावरणाच्या आव्हानांना आपण सक्षमपणे तोंड देऊ शकू आणि या कामी राजर्षी शाहूंचा सामाजिक क्रांतीचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरने पुढाकार घ्यावा.
स्वातंत्र्यानंतर दुष्काळ दहापटींनी, तर पूर परिस्थितीत आठपटींनी वाढली
पर्यावरणासंबंधी धोरणे आखतानाही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना आवडतील असे सल्ले देणारेच सल्लागार
फक्त पुस्तकी ज्ञान न देता कृतिशील कार्यक्रमाची आखावेत