सत्ता, सत्तांतर की परिवर्तन; भोगावतीचा उद्या फैसला
By admin | Published: April 23, 2017 05:09 PM2017-04-23T17:09:01+5:302017-04-23T17:09:01+5:30
तिन्ही आघाड्यांकडून सत्तेचा दावा : क्रॉस व्होटींगचा फटका कोणाला?
अमर मगदूम/आॅनलाईन लोकमत
राशिवडे , दि. २३ : : सहकाराचा मानबिंदू ठरलेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्यावर कोणाची सत्ता येणार याचा फैसला आज होत असुन कार्यक्षेत्रातील ५८ गावात तिन्ही आघाड्यांनी प्रचार सभामधुन आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडवला होता. सत्तेचा लंबक दोलायमान राहील्याने तिन्ही आघाड्यांनी विजयाचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी व मित्रपक्षांची दादासाहेब कौलवकर महाआघाडी पुन्हा सत्तेवर येणार की माजी आमदार पी.एन.पाटील यांची शाहू आघाडी सत्तांतर घडवणार याविषयी जिल्हात उत्सुकता आहे. तर दोन्ही आघाड्यांना भोगावतीच्या कार्यक्षेत्रातून हाकलुन द्या असे आवाहन करत भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडी परिवर्तन घडवणार याचा फैसला येत्या काही तासात होणार आहे. उद्या दुपारी चार वाजेपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
भोगावतीच्या रणांगणात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. जालंदर पाटील यांच्यासह विद्यमान आमदार चंद्रदिप नरके, सुरेश हाळवणकर, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, के पी. पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचारसभा घेऊन भोगावतीचे कार्यक्षेत्र ढवळुन काढले. तर काँग्रेसचे सतेज पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ हे थेट प्रचारापासुन अलिप्त राहीले. या सर्वाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात भोगावती च्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भोगावती साठी राधानगरी आणि करवीर तालुक्यातील ३०५२१ शेतकरी सभासद असून ५४ गावातील आहेत.तर संस्था गटातील सभासद संख्या ४६८ आहे .
सहा गटातून एकवीस उमेदवार निवडले जाणार आहेत. तिरंगी लढतीत काँग्रेसचे राजर्षी शाहू शेतकरी सेवा पैंनेल तर राष्ट्रवादी, शेकाप, भाजप, शिवसेना, शेतकरी संघटना, जनता दल यांची दादासाहेब पाटील कौलवकर महाआघाडी, तर सदाशिवराव चरापले यांचे नेतृत्वाखाली भोगावती परिवर्तन पॅनेल अशी तिरंगी लढत चुरशीने झाली.
पहिला गुलाल संस्था गटाचा! क्रॉस व्होटींग मोठ्या प्रमाणात झाल्याने मोजणीस विलंब लागण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. संस्था गटात केवळ ४६८ मतदार असल्याने या गटाचा पहिल्यांदा निकाल लागणार आहे.