कार्यपद्धती बदला; अन्यथा २०१४ सारखी वेळ येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:34 AM2020-12-30T04:34:29+5:302020-12-30T04:34:29+5:30
कोल्हापूर : राजकीय कार्यपद्धती बदला, अन्यथा २०१४ सारखी वेळ येईल, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष माजी आमदार राजेश ...
कोल्हापूर : राजकीय कार्यपद्धती बदला, अन्यथा २०१४ सारखी वेळ येईल, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना मंगळवारी दिला. महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीऐवजी स्वबळावर लढण्याचे क्षीरसागर यांनी प्रथम जाहीर केले असल्याचे वक्तव्य कसबा बावडा येथील सभेत पालकमंत्र्यांनी केल्याने क्षीरसागर संतप्त झाले आहेत.
पत्रकारांशी बोलताना क्षीरसागर म्हणाले, राष्ट्रवादीने प्रथम ८१ जागा लढविण्याची घोषणा केली. यानंतर काँग्रेसने हीच भूमिका घेतली. मग शिवसेनेसारख्या स्वाभिमानी पक्षाने आम्ही कुठे कमी नाही, या दृष्टिकोनातून स्वबळावर लढण्याचे जाहीर केले. मंत्री पाटील २०१७ मध्ये विधान परिषदेवर निवडून आले. यावेळी शिवसेनेने त्यांना मदत केली. मात्र, विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी आम्हांला धोका दिला. शिवसेना शहरात कमजोर असल्याचे भासवून महापालिकेत जादा जागा द्याव्या लागू नयेत, या हेतूने पालकमंत्री पाटील यांनी स्वबळाची भूमिका घेतली आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादीला राजकीय टेकओव्हर करण्याचा त्यांचा डाव आहे.
शिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच पालकमंत्री पाटील प्रथम निवडून आले. शिवसेनेचे हाताचे बोट धरून प्रथम विधानसभेत गेले हे ते आज विसरले आहेत. शिवसेनेने त्यांना मदत करूनही त्यांनी आमच्यावर अन्याय केला आहे. सामान्य नागरिकांची कामे करतो, आपल्या पाठीशी कोणीही नाही म्हणून आपल्यावर काहीही खापर फोडू नये, असेही क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
दिवस बदलतात...
महाडिक कुटुंबामध्ये २०१४ ला सर्व सत्ता होती. त्यावेळी तुमच्याकडे काहीच नव्हते. आता तुम्ही पालकमंत्री आहात, पुतण्या आमदार आहे. यावरून राजकीय स्थिती कायम राहत नाही, हे लक्षात घ्या, असेही क्षीरसागर यांनी म्हटले आहे.