अन्यायकारक एलबीटीमुळे आता राज्यात परिवर्तन अटळ
By admin | Published: May 28, 2014 01:06 AM2014-05-28T01:06:55+5:302014-05-28T01:07:05+5:30
शिवसेनेचा इशारा : महापालिकेसमोर केली तीव्र निदर्शने
कोल्हापूर : एलबीटी (स्थानिक संस्था कर)बाबत काँग्रेस आघाडी सरकारने हिताचा निर्णय घेतला नाही, तर विधानसभा निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे, असा इशारा देत शिवसेनेने महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज, मंगळवारी तीव्र निदर्शने केली. एलबीटीबाबत राज्य सरकार गेले तीन वर्षे निर्णय घेत नाही. फेडरेशन आॅफ असोसिएशन महाराष्ट्र (फाम)या व्यापार्यांच्या शिखर संस्थेनंतर सरकारला पाच जूनपर्यंत डेडलाईन दिली आहे. आज अन्यायकारक एलबीटीच्या विरोधात ‘रद्द करा, रद्द करा, एलबीटी रद्द करा’, अशा घोषणा देत निदर्शने केली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी, शासन एलबीटीवर निर्णय घेण्यास विलंब लावत आहे. आता चर्चा करायची नाही तसेच थांबायचेसुद्धा नाही, सरकारने व्यापारी हिताचा निर्णय घ्यावा. चार महिन्यांवर येणार्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन अटळ असून, हे सरकार घालवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कोल्हापूर उद्योजक व व्यापारी महासंघाचे निमंत्रक सदानंद कोरगावकर, प्रदीपभाई कापडिया यांनी मत व्यक्त केले. यानंतर आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना याप्रश्नी निवेदन दिले. निदर्शनात रणजित जाधव, तुकाराम साळोखे, सुरेश गायकवाड, धनाजी दळवी, दुर्गेश लिंग्रज, सुनील जाधव, जयवंत हारुगले, मेघना पेडणेकर, मंगलताई कुलकर्णी, आदींचा सहभाग होता. राक्षसाची प्रतिकृती... शिवसेनेने राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी राक्षसाची प्रतिकृती आणली होती. हा राक्षस यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.