देखाव्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गांत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:25 AM2019-09-10T11:25:07+5:302019-09-10T11:29:10+5:30
सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे, मूर्ती, सजावटी पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील लोकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी काही मार्ग बंद, तर काही मार्ग खुले केले आहेत.
कोल्हापूर : सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे, मूर्ती, सजावटी पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील लोकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी काही मार्ग बंद, तर काही मार्ग खुले केले आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
बंद व खुले केलेले मार्ग|
भवानी मंडप येथून शिवाजी चौकाकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना सोळंकी कोल्ड्रिंक हाऊस या ठिकाणी प्रवेश बंद केला आहे. या वाहनांनी जेल मार्गाने बिंदू चौक या एकेरी मार्गाचा वापर करावा. बिनखांबी गणेश मंदिराकडून निवृत्ती चौकाकडे जाणाऱ्या सर्व मोटार वाहनांना बिनखांबी या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. गांधी मैदानकडून खरी कॉर्नरला जाणाºया सर्व वाहनांना गांधी मैदान मेनगेट येथे प्रवेश बंद केला, ही वाहने महाराष्ट्र हायस्कूलमार्गे पुढे मार्गस्थ होतील.
मिरजकर तिकटी व गांधी मैदानकडून खरी कॉर्नरमार्गे लाड चौकाकडे जाणाºया चारचाकी मोटार वाहनांना खरी कॉर्नर या ठिकाणी प्रवेश बंद केला आहे. ही वाहने गांधी मैदानमार्गे पुढे जातील. तटाकडील तालीम, सरस्वती टॉकीज, उभा मारूती चौक, निवृत्ती चौकाकडे येणारी वाहने बिनखांबी गणेश मंदिर किंवा गांधी मैदानमार्गे पुढे जातील. राधानगरीमार्गे येणारी वाहने बिनखांबीमार्गे पुढे जातील. कोकणातून गगनबावडामार्गे येणारी वाहने फुलेवाडी नाका ते आपटेनगर चौक, साई मंदिर कळंबा रिंगरोडवरून ताराराणी चौकातून पुढे जातील.
शिये फाटा येथून कसबा बावडा मार्गे कोल्हापुरात येणारी सर्व वाहने रात्री आठपासून शिये फाटा येथून महामार्गावरून पुढे सरळ जाऊन तावडे हॉटेलमार्गे कोल्हापुरात येतील. तसेच याच शहरातून बावडामार्गे जाणारी वाहने ताराराणी चौकातून पुढे जातील. शुक्रवार पेठेत वाघाच्या तालमीकडे जाणारी वाहतूक एकेरी केली आहे. राजारामपुरी ११ वी गल्ली आग्नेय मुखी मारूती मंदिर ते जनता बाजारकडे येणाºया मेन रोडवरील वाहतूक दोन्ही बाजूने बंद केली आहे. माउली पुतळा ते कमला कॉलेजकडे जाणारी वाहतूक एकेरी केली आहे.
वाहनतळ
बिंदू चौक मनपा पार्किंग, सिद्धार्थनगर मैदान, दसरा चौक, राजारामपुरी शाळा नंबर ९, उर्मिला चित्रपटगृह महापालिका पार्किंग, शहाजी लॉ कॉलेजचे मैदान, मेन राजाराम मैदान, प्रायव्हेट हायस्कूल मैदान, चिन्मय इलेक्ट्रॉनिक, गांधी मैदान, पेटाळा हायस्कूल येथे पार्किंगची सोय केली आहे. वाहनधारकांनी येथे गाड्या उभ्या करून देखावे पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.