जिल्ह्यातील कायापालट योजना प्राधान्याने मांडणार

By Admin | Published: October 26, 2015 11:58 PM2015-10-26T23:58:39+5:302015-10-27T00:06:15+5:30

पंकजा मुंडे : विकास परिषदेत होणार योजनेचा प्रसार; ‘गोशिमा’च्या सभागृहात विविध विभागांची आढावा बैठक

Changes in the district will be explained in priority | जिल्ह्यातील कायापालट योजना प्राधान्याने मांडणार

जिल्ह्यातील कायापालट योजना प्राधान्याने मांडणार

googlenewsNext

कोल्हापूर : ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा कायापालट करून ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देणारी कायापालट योजना अत्यंत प्रभावी आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांमधूनही ही योजना प्रभावीपणे राबविली जावी यासाठी विविध जिल्ह्यांमधून राबविण्यात येणारे अभिनव प्रयोग, योजना यांचे आदान-प्रदान होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या विकास परिषदेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची कायापालट योजना प्राधान्याने मांडली जाणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी येथे केले.गोकुळ शिरगाव येथील ‘गोशिमा’च्या सभागृहात विविध विभागांची आढावा बैठक झाली. बैठकीत बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम, कायापालट योजना, पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठीचे प्रयत्न, जलयुक्त शिवार योजना, आदींचा सूक्ष्म आढावा घेऊन पंकजा मुंडे म्हणाल्या, कोल्हापूर जिल्ह्यात पर्जन्यमान चांगले आहे. सिंचनाच्या व्यवस्था चांगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी कोल्हापूर जिल्ह्याने वेगळा प्रस्ताव तयार करावा. जलयुक्त शिवार या योजनेंतर्गतच विशेष प्रस्ताव म्हणून याला मान्यता देण्यात येईल.
जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ३०० किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकीन पुरविण्यासाठी ६९ लाखांचा निधी जिल्हा नियोजनमधून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी सांगितले. यावर राज्यभरातील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीन पुरविण्याचा विचार आपल्या विभागामार्फत सुरू असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या लक्ष्मी आली घरा, चिरायू योजना, लक्ष्मीचे पाऊल, सासू-सून मेळावा, आदी वैविध्यपूर्ण योजनांची तसेच नॅशनल अ‍ॅ़क्रिडेशन बोर्ड आॅफ हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअरचे मानांकन मिळविण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. या योजनांबद्दल पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिवाजी साठे, जिल्हा आरोग्य अधिकारी आर. एस. आडकेकर, बसवराज मास्तोळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) शिल्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

‘कायापालट’मुळे ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण बदल
कायापालट योजनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेत व सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण बदल झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या प्रसूतींची संख्या वाढली आहे. १० लाख ५३ हजार बाह्य, तर ७३ हजार ९०६ आंतररुग्णांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांकडून उपचार घेतले आहेत.
हा लक्षणीय बदल कायापालट योजनेमुळे झाला आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांमधूनही ही योजना प्रभावीपणे राबविली जावी व तळागाळातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

Web Title: Changes in the district will be explained in priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.