शेती वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या वीजपुरवठ्याचे वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 11:37 AM2022-01-22T11:37:21+5:302022-01-22T11:38:05+5:30
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येणार
कोल्हापूर : जिल्ह्यातील महावितरणच्या कोल्हापूर ग्रामीण एक आणि दोन या विभागातील शेतीवीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री सतेज पाटील यांनी निर्देश दिल्यानंतर महावितरणकडून रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत शेतीसाठीवीजपुरवठा करण्यात येणार आहे. दिवसाच्या वीज वेळेत सकाळी ९ ते ५ ऐवजी सकाळी ८.४० ते ४.४० वाजेपर्यंत शेतीसाठी वीजपुरवठा केला जाणार आहे.
महावितरणच्या कोल्हापूर ग्रामीण एक विभागात पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, करवीरचा समावेश होतो. पालकमंत्री पाटील यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर ग्रामीण एक विभागात रात्री १.१५ ते सकाळी ९.१५ ऐवजी आता रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत शेतीसाठी वीजपुरवठा केला जाईल. कोल्हापूर ग्रामीण दोन विभागात राधानगरी, कागल, भुदरगड या तालुक्यांचा समावेश होतो. कोल्हापूर ग्रामीण दोन अंतर्गत तालुक्यात रात्री १ ते सकाळी ९ ऐवजी आता रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत वीज उपलब्ध असेल.
महावितरणने या भागातील शेतीच्या वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केले होते. रात्रीच्या वेळी नागरीवस्तीसह शेतभागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतीच्या वेळापत्रकात बदल व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री पाटील यांच्याकडे केली होती.