कायद्यातील बदलाची जिल्हा बँकेत धास्ती
By admin | Published: January 5, 2016 11:38 PM2016-01-05T23:38:54+5:302016-01-06T00:43:34+5:30
चर्चेला उधाण : राजकारण बदलणार
सांगली : भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून जे संचालक मंडळ बरखास्त झाले असेल, त्यांना दहा वर्षे निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सांगली जिल्हा बँकेतील संचालक मंडळही साडेतीन वर्षापूर्वी बरखास्त झाले होते. त्यातील काही संचालक सध्याच्या मंडळात आहेत. त्यामुळे त्यांचेही जिल्हा बँकेतील राजकारण अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी सध्या अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये १५७ कोटीचे व सव्वाचार कोटीचे प्रकरण आहे. सहकार कायद्यातील कलम ११0-क नुसार एखाद्या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येते, तेव्हा संबंधित बँकेचा कारभार सुधारण्यासाठी संचालक मंडळाला अनेकवेळा संधी दिली जाते. तरीही त्यात सुधारणा झाली नाही, तर अधिनियम १९४९ नुसार कलम ३५ नुसार संचालक मंडळाच्या कारभारावर निर्बंध घालून सुधारणा केल्या जातात. मात्र, संबंधित प्रकरणात चौकशी पूर्ण होऊन वसुलीच्या प्रक्रियेपर्यंत संबंधित संचालकांना वारंवार म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. या प्रक्रियेत मोठा कालावधी निघून जातो. त्यामुळे कलम ७३ क (अ) मध्ये सुधारणा करावी व रिझर्व्ह बँकेने बरखास्त केलेल्या मंडळातील संचालकांना सहकारी बँकांच्या निवडणुका लढविण्यासाठी १0 वर्षे अपात्र ठरविण्याची शिफारस करण्यात आली होती.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे यापूर्वीचे संचालक मंडळ २0१२ मध्ये बरखास्त झाले होते. यामधील काही संचालक सध्याच्या मंडळात आहेत. अधिनियमातील दुरुस्तीमुळे त्यांच्यावर नेमका काय परिणाम होणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणात जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते गुंतले आहेत. वर्षानुवर्षे बँकेशी त्यांचा कोणत्या ना कोणत्या कारणाने संबंध आला आहे. नव्या बदलाचे परिणाम जिल्हा बँकेला कधी लागू होणार, ते पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार, की भविष्यकाळासाठी, याबाबत अद्याप कोणालाही कल्पना नाही. तरीही या बदलाची धास्ती आता जिल्हा बँकेत जाणवू लागली आहे. (प्रतिनिधी)
सांगली, कोल्हापूर, साताऱ्यातील रिक्षा चालकांची बाजी
रिक्षा सौंदर्य स्पर्धा : ३१ वर्षांपूर्वीच्या रिक्षाने सर्वांचे लक्ष वेधले; एकापेक्षा एक रिक्षांच्या सहभागाने नागरिकांनीही केली गर्दी
सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी बाजी मारली. सोमवारी रात्री झुलेलाल चौकात या स्पर्धा झाल्या.
सांगली, कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्यांच्या गटात खुला गट व केवळ सांगली जिल्हा खुला गट अशा दोन गटात या स्पर्धा झाल्या. तीन जिल्ह्यांच्या गटात दीपक पवार (कोल्हापूर) यांच्या रिक्षाने (क्र. एमएच ०९, जे ७५७५) प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांची रिक्षा वातानुकूलित होती. रिव्हर्स कॅमेराही होता. रिव्हर्स गिअर टाकल्यानंतर दर्शनी बाजूस मोठा स्क्रीन आहे. या स्क्रीनवर त्यांना रस्त्यावरील पाठीमागचे दिसते. तसेच रिक्षात २६/११ मध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची छायाचित्रे लावली आहेत. अनिल पोवार (रा. कोल्हापूर) यांच्या रिक्षाने (क्र. एमएम ०९ जे ७७७५) दुसरा क्रमांक मिळविला. त्यांचीही रिक्षा वातानुकूलित होती. २६/११ मध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची छायाचित्रे, साऊंड सिस्टीम व माशाची पेटी ठेवण्यात आली होती. मुस्ताक पेंटर (सातारा) यांच्या रिक्षाने (क्र. एमटीक्यू ७६७७) तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांची रिक्षा १९८४ मॉडेलची आहे. पुढच्या इंजिनच्या या रिक्षाने लक्ष वेधून घेतले. रिक्षात त्यांनी सातारा जिल्ह्यातील गडदर्शन (छायाचित्रे) लावली आहेत. स्पर्धेला जाताना ते प्रत्येकवेळी रिक्षाचा रंग बदलतात.
सांगली जिल्हा खुल्या गटात पैगंबर रावलसाब (सांगली) यांच्या रिक्षाने (क्र. एमएच १० के. ४५७६) प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी रिक्षावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. पाठीमागे ‘मुंबई एक्स्प्रेस’ लिहिले आहे. रिक्षात रिव्हर्स कॅमेरा आहे. राजवाडा चौकातील गणेशदुर्ग गणेश मंदिराचे छायाचित्र लावले आहे. इस्माईल मिर्झा (मिरज) यांच्या रिक्षाने (क्र. एमएच १० के. ४६३५) व अजित भोसले (क्र. एमएच १० जे २५५९) या रिक्षाने तृतीय क्रमांक मिळविला. त्यांच्या रिक्षावर आकर्षक विद्युत रोषणाई करून रिव्हर्स कॅमेरा बसविला आहे.
विजेत्या रिक्षाचालकांना रणजित सावर्डेकर यांच्याहस्ते बक्षीस देण्यात आले. खा. संजयकाका पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी गजानन बाबर, फिरोज मुल्ला, रामचंद्र पाटील, शेखर शिंदे यांच्यासह एकता रिक्षा मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)