परीख पुलाचे रूप पालटले...
By admin | Published: January 30, 2015 12:51 AM2015-01-30T00:51:49+5:302015-01-30T00:52:51+5:30
‘युवा स्वराज्य’चा उपक्रम : भिंतीवर रेखाटली ‘कोल्हापुरी वैशिष्ट्ये’
कोल्हापूर : ड्रेनेजच्या तुंबलेल्या पाण्याची दुर्गंधी, माखलेली धूळ, जळमटे अशा दुरवस्थेत बाबूभाई परीख पूल होता. मात्र, ‘युवा स्वराज्य’ ग्रुपच्या पुढाकारामुळे या पुलाचे रूप पालटले आहे. परिसराची स्वच्छता, भिंतीवर रेखाटण्यात आलेल्या ‘कोल्हापूरची वैशिष्ट्ये’ असलेल्या चित्रांमुळे आता पुलाला एक वेगळे रूप मिळाले आहे.
खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वनाथ आणि कृष्णराज यांच्या पुढाकारातून ‘युवा स्वराज्य’ने बाबूभाई परीख पुलाची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काल, बुधवारी त्याची स्वच्छता केली. आज, गुरुवारी रात्री दहा वाजता पुलाच्या भिंतींची रंगरंगोटी केली आणि त्याठिकाणी वेगवेगळी चित्रे रेखाटण्याचे काम चित्रकार विजय टिपुगडे, सागर बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक चित्रकार, कलाकारांनी सुरू केले. यावेळी खासदार महाडिक, मिलिंद धोंड, आदी उपस्थित होते. पुलाच्या भिंतीवर संगीत, चित्र, शिल्प, महाराणी ताराराणी, बाबूराव पेंटर, प्रभातची तुतारी, सेंट चर्च, आदी स्वरूपांतील कोल्हापूरची वैशिष्ट्ये रेखाटण्यात आली. पहाटे चार वाजेपर्यंत चित्रे रेखाटण्याचे काम सुरू होते. या उपक्रमात पुरुषोत्तम पोवार, सर्वेश देवरुखकर, हर्षद व्हरकट, मुकुंद हरमलकर, आदित्य कुलकर्णी, कौस्तुभ कुलकर्णी, अजित पाटील, अमर गायकवाड, आदी कलाकार, चित्रकार सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)