यंदा अकरावीच्या विज्ञान, वाणिज्य शाखेसाठीच केंद्रीय प्रवेश प्रक्रिया; नोंदणी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 02:21 PM2022-06-17T14:21:27+5:302022-06-17T14:21:54+5:30
गेल्या तीन वर्षांपासून अकरावीच्या कला शाखेसाठी प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी
कोल्हापूर : दरवर्षी शहरातील विविध ३३ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठी केंद्रीय प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, यावर्षी त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. यंदा अकरावीच्या केवळ वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना समितीकडे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. कला शाखेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजमध्ये अर्ज करायचा आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची प्रक्रिया आज, शुक्रवारी दुपारी एक वाजता सुरू होणार आहे.
यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीची गेल्या महिन्यात एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये बैठक झाली. त्यामध्ये प्रवेश प्रक्रियेबाबत चर्चा झाली. त्यात गेल्या तीन वर्षांपासून अकरावीच्या कला शाखेसाठी प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा विद्यार्थ्यांचे अर्ज कमी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून कला शाखा वगळून कॉलेज पातळीवर अर्ज करण्याची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार यावर्षी केंद्रीय समितीकडून केवळ वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेची ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या दोन्ही विद्याशाखांच्या प्रवेशासाठी अर्जातील पहिला भाग (विद्यार्थी नोंदणी) भरण्याची प्रक्रिया शुक्रवारी दुपारी एकपासून सुरू होणार आहे. दहावीची मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर प्रवेशाचे पुढील वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी गुरुवारी सांगितले.
गेल्यावर्षी कला शाखेत अवघे ८१७ प्रवेश
कोरोनामुळे ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी आपल्या गावापासून जवळ असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशित झाले आहेत. त्याचा परिणाम इयत्ता अकरावीच्या प्रवेशाकडील विद्यार्थ्यांचा कल कमी होण्यावर झाला. गेल्यावर्षी कोल्हापूर शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ६० टक्के म्हणजे ८९७६ जागा रिक्त राहिल्या. कला मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाखेत एकूण ८१७ विद्यार्थी प्रवेशित झाले होते.