बदलती स्त्रीप्रतिमा आशादायक

By Admin | Published: December 25, 2016 01:06 AM2016-12-25T01:06:44+5:302016-12-25T01:06:44+5:30

रेखा देशपांडे यांचे मत : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत मुक्तसंवाद

Changing feminine hopeful | बदलती स्त्रीप्रतिमा आशादायक

बदलती स्त्रीप्रतिमा आशादायक

googlenewsNext

कोल्हापूर : भारतीय चित्रपटाचा जन्म झाला तो पुराणकथा आणि ऐतिहासिक कथांमधून. या चित्रपटांमध्ये अभिनेत्रीला ठरवून दिलेली चाकोरीतील दुय्यम भूमिका करावी लागत असे. नव्वदच्या दशकात यात बदल होत गेला आणि आता स्त्रीप्रधान चित्रपट निघत आहेत, स्त्रीची प्रतिमा बदलत आहे हे एक आशादायक चित्र आहे, असे मत सिनेसमीक्षक रेखा देशपांडे यांनी व्यक्त केले.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे सुरू असलेल्याकोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत आयोजित मुक्तसंवादात त्यांनी ‘भारतीय चित्रपटातील स्त्रीप्रतिमा’ या विषयावर रसिकांशी संवाद साधला. योगेश्वर गंधे आणि दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी हा संवाद अधिक खुलविला.
रेखा देशपांडे म्हणाल्या, पूर्वीच्या अभिनेत्रींना सालस, सोशिक अशा भूमिकांची चाकोरी आखून दिली होती. हे पुरुषप्रधान संस्कृतीचेच एक द्योतक होते. नंतर मात्र ही चाकोरी मोडणारे चित्रपट निघू लागले. मदर इंडिया, पाकिजा, कुंकू, घुंगुर हे चित्रपट त्याचेच प्रतीक आहेत. त्यानंतर महिला खलनायिकेच्या भूमिकेत आल्या. २०१० नंतर मात्र चित्रपटातील स्त्रीप्रतिमा वेगाने बदलली. अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसू लागल्या. चित्रपटाचे कथानक नायिकेला केंद्रस्थानी ठेवून बनविले जाते. तेलुगू, मराठी, हिंदी चित्रपटांतून हा बदल जाणवतो.
‘सैराट’चे उदाहरण देत त्या म्हणाल्या, या चित्रपटात अभिनेत्यापेक्षा अभिनेत्री जास्त धाडसी आणि बिनधास्त दाखविली आहे. ती पुढाकार घेऊन स्वत:चे प्रेम मिळविते. मात्र, आजही स्त्रीच्या व्यक्तिरेखेपेक्षा आणि तिच्या भूमिकांपेक्षा चारित्र्यावर होणारी चर्चा पुरुषी मानसिकतेचेच लक्षण आहे. प्रत्येक कालखंडात वेगवेगळे प्रवाह असतात, त्या प्रवाहाचे प्रतिबिंब या चित्रपट माध्यमातून उमटते. महोत्सवात आज, रविवारी लघुपट स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Changing feminine hopeful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.