चन्नेकुप्पीच्या संदेशचे आंतरराष्ट्रीय टेनिसपटू बनण्याचे स्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:22 AM2021-04-15T04:22:10+5:302021-04-15T04:22:10+5:30
शिवानंद पाटील गडहिंग्लज : महागडा व उच्चभ्रू खेळाडूंचा खेळ म्हणून ग्रामीण भागातील खेळाडूंनी लॉन टेनिसकडे पाठ फिरविल्याचे चित्र आज ...
शिवानंद पाटील
गडहिंग्लज : महागडा व उच्चभ्रू खेळाडूंचा खेळ म्हणून ग्रामीण भागातील खेळाडूंनी लॉन टेनिसकडे पाठ फिरविल्याचे चित्र आज सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, वडिलांची साथ, प्रबळ इच्छाशक्ती आणि केवळ जिद्दीच्या जोरावर, कोणतीही साधने व बरोबरीला दुसरा स्पर्धक खेळाडू नसतानाही, आंतरराष्ट्रीय लॉन टेनिसपटू बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथील संदेश दत्तात्रय कुरळे या उदयोन्मुख टेनिसपटूचा प्रवास निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
टेनिस खेळाच्या सरावासाठी तालुक्यात कोठेही लॉनची सोय उपलब्ध नाही. तरीही अनेक अडचणीवर मात करून लॉन टेनिसमध्येच करिअर घडविण्याचा संदेशने निर्धार केला आहे. गावाकडे जिरायती शेती आणि गडहिंग्लजमध्ये चहाचा स्टॉल चालविणारे दत्तात्रय कुरळे, आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला खंबीरपणे साथ देत आहेत.
पहिलीमध्ये असतानाच वडिलांनी त्याला गडहिंग्लजच्या अॅथलेटिक्स अकादमीत प्रवेश मिळवून दिला. जवळपास सरावासाठी काहीच सोय नसल्याने शनिवार व रविवारी कोल्हापूरला जाऊन सराव करायला सुरुवात केली. त्यासाठी पहाटे लवकर उठून बसने कोल्हापूर गाठायचे आणि रात्री उशिरा परतायचे, असा नित्यक्रम सुरू ठेवला. संदेशची मेहनत पाहून, त्याला कशाचीही उणीव भासू नये यासाठी वडिलांनी कर्ज काढून आपल्या शेतातच लॉन टेनिस कोर्टची उभारणी केली.
रोज ६ तास सराव आणि २ तास शारीरिक तंदुरुस्तीवर भर देऊन खेळातील कौशल्य त्याने आत्मसात केले. कोल्हापूर येथील उत्तम फराकटे, आरिफ सिद्धकी हे प्राथमिक स्वरूपाचे आणि तीन वर्षापासून प्रशिक्षक हर्षद देसाई व मनाल देसाई त्याला मार्गदर्शन करत आहेत.
बारावीमध्ये शिकणाऱ्या संदेशने अलीकडील इंदोर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या अखिल भारतीय लॉन टेनिस स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील अजिंक्यपद पटकावून आपली यशस्वी घोडदौड सुरू केली आहे.
------------------------------------
* तीनवेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व
राष्ट्रीय स्पर्धेत तीनवेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. १७ वर्षे गटात रौप्यपदक, तर जयपूर, हरियाणा, जालंधर येथील स्पर्धेतही त्याने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने हरियाणाचा राष्ट्रीय विजेता खेळाडू किसन हुडा व आदिल नाडाल आणि कर्नाटकचा आयुष्य भट यांचा पराभव केला आहे.
-----------------------
फोटो ओळी :
गडहिंग्लज येथे साधना प्रशालेतर्फे प्राचार्य जे. बी. बारदेस्कर यांनी संदेश कुरळे याचा सत्कार केला. यावेळी जी. एस. शिंदे, अरविंद बारदेस्कर, रफिक पटेल आदी उपस्थित होते.
क्रमांक : १४०४२०२१-गड-०३