चॅनलची मक्तेदारी, ग्राहकांची लूट: कमी पसंतीची चॅनल गळ्यात मारण्याचा ‘डाव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 10:57 AM2019-11-28T10:57:26+5:302019-11-28T11:03:56+5:30
केबल चालकांकडून १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी १५० ते २५० रुपयांमध्ये ४०० पेक्षा जास्त चॅनलचे प्रक्षेपण केले जात होते. यामध्ये ग्राहकांना नको असणारीही चॅनल पाहण्याची वेळ येत होती. ठरावीक चॅनलसाठी सर्व चॅनलचे पैसे देण्याची वेळ त्यांच्यावर येत होती.
विनोद सावंत
कोल्हापूर : पसंतीनुसार चॅनल निवडीच्या नियमामुळे वास्तविक केबल ग्राहकांना कमी दरात चॅनल मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, चॅनल कंपन्यांच्या खेळीमुळे पूर्वी जी चॅनल १५० ते २५० रुपयांना मिळत होती, ती आता २५० ते ३५० रुपयांमध्येही मिळत नाहीत. त्यामुळे नवीन नियम सुरू करूनही चॅनलची मक्तेदारी कायम आहे. त्यांच्याकडून नियमांतील पळवाट काढून ग्राहकांची लूट सुरू आहे.
केबल चालकांकडून १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी १५० ते २५० रुपयांमध्ये ४०० पेक्षा जास्त चॅनलचे प्रक्षेपण केले जात होते. यामध्ये ग्राहकांना नको असणारीही चॅनल पाहण्याची वेळ येत होती. ठरावीक चॅनलसाठी सर्व चॅनलचे पैसे देण्याची वेळ त्यांच्यावर येत होती. यावर पर्याय म्हणून ‘ट्राय’ने (टेलिव्हिजन रेग्युलेटरी आॅथॉरिटी आॅफ इंडिया) पसंतीनुसार चॅनल घेण्याची सुविधा केली. यामुळे केबल ग्राहकांना कमी दरात चॅनल उपलब्ध होतील, असे चित्र रंगविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र वेगळेच होत आहे. नवीन नियमाचा फायदा कमी, तोटाच जास्त झाला, अशी भावना ग्राहकांतून व्यक्त होत आहे.
- लोकप्रियसोबत कमी पसंतीची चॅनल खपविण्याची ‘खेळी’
सध्या सर्वच चॅनल कंपन्यांची पॅकेजेस आहेत. यामध्ये १५ ते २० चॅनल आहेत. यात स्पोर्टस, विविध भाषा, मनोरंजन, गीत, इंग्रजी चित्रपट, कार्टुन चॅनलचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये एक किंवा दोनच चॅनल जादा पसंतीची असतात. त्यामुळे कमी महत्त्वाची चॅनल कोणीही घेणार नाही. हे ओळखून कंपनीने जादा पसंतीच्या चॅनलचे दर जादा लावले आहेत; तर जादा पसंतीच्या चॅनलसह पॅकेज घेतले तर ते स्वस्तामध्ये उपलब्ध केले आहे. यामुळे जादा पसंतीच्या चॅनलसोबत कमी महत्त्वाची चॅनल ग्राहकांच्या गळ्यात मारण्याचा डाव चॅनल कंपनीकडून सुरू आहे.
- २५० रुपये देऊनही महत्त्वाच्या चॅनलपासून वंचित
काही ठरावीक चॅनल लोकप्रिय आहेत. ती स्वतंत्र घेतली तर प्रतिचॅनल २० रुपयांप्रमाणे घेण्याची वेळ येत आहे, अशी जादा पसंतीची केवळ पाच चॅनल घ्यावयाची म्हटल्यास १०० रुपये खर्च करावे लागतात. तसेच मोफत १०० चॅनलसाठी १५३ रुपयांचा खर्च वेगळा आहे. परिणामी पसंतीची सर्व स्वतंत्र चॅनल घेणे परवडत नाही. त्यामुळे ठरावीक चॅनलची पॅकेज घेतली जात आहेत. यामध्ये काही चॅनलपासून ग्राहक वंचित आहेत.
स्पोर्टसची सर्व चॅनल घेणे शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश ग्राहकांना खेळाचे थेट सामने पाहण्यासाठी घरात टी.व्ही. असूनही दुसऱ्यांच्या घरी जाण्याची वेळ येत आहे. याचबरोबर १३० मध्ये जी काही मोफत १०० चॅनल आहेत, ती कमी पसंतीची आहेत; त्यामुळे पसंतीच्या चॅनलसाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.