फोर्ड कॉर्नर येथील चॅनलचे काम सुरू, दीड महिना रस्ता राहणार बंद : वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:35 AM2019-11-06T11:35:53+5:302019-11-06T11:37:28+5:30
फोर्ड कॉर्नर येथील कोल्हापूर अर्बन बँकेसमोरील आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले. त्यासाठी फोर्ड कॉर्नर ते टायटन शोरूमपर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला आहे. हे काम ४१ दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, येथील व्यवसायावर परिणाम होणार आहे.
कोल्हापूर : फोर्ड कॉर्नर येथील कोल्हापूर अर्बन बँकेसमोरील आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले. त्यासाठी फोर्ड कॉर्नर ते टायटन शोरूमपर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला आहे. हे काम ४१ दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, येथील व्यवसायावर परिणाम होणार आहे.
फोर्ड कॉर्नर ते टायटन शोरूम परिसर हा सखल भागात असल्यामुळे महापुरावेळी येथे चार ते पाच दिवस पाणी साठून राहिले होते. अनेकांच्या घरांमध्ये तसेच दुकानांमध्येही पाणी शिरले होते. उमा टॉकीज, अयोध्या टॉकीज परिसरातील सांडपाणी येथील ड्रेनेज लाईनमधून जाते. सखल भाग आणि जुन्या लाईनमुळे वारंवार गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत होते. तसेच परतीच्या पावसातही सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले होते.
यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने निधी मंजूर करून येथे आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम सुरू केले आहे. महापालिका विभागीय कार्यालय क्रमांक २, शिवाजी मार्केटअंतर्गत फोर्ड कॉर्नर येथील अर्बन बँकेच्या परिसरातील रस्ता बंद आहे.
वाहतूक पर्यायी मार्गाने
हा शहरातील महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे चॅनेलच्या कामादरम्यान वाहतुकीत अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे अयोध्या टॉकीज ते दसरा चौक व संभाजी पूल आणि व्हीनस कॉर्नर ते टायटन शोरूम या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण यांनी केले आहे.
काम रखडू देऊ नका
हा रस्ता वाहतुकीसाठी किमान ४१ दिवस बंद राहणार आहे. यामुळे परिसरातील व्यापारावर परिणाम होणार आहे. खानविलकर पेट्रोल पंप येथे अशाच प्रकारचे काम सुरू असून, सहा महिन्यांपासून काम रखडले आहे. येथील व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अनुभव पाहता महापालिकेने काम रखडू देऊ नये, ते तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी फोर्ड कॉर्नर येथील व्यावसायिकांकडून होत आहे.