आयओएन परिक्षा केंद्रावर गोंधळ, विद्यार्थांना प्रवेश नाकारला; केंद्राला टाळे ठोण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा
By विश्वास पाटील | Published: August 13, 2023 07:19 PM2023-08-13T19:19:24+5:302023-08-13T19:19:52+5:30
केंद्र चालकांचा हा मनमानी कारभार कित्येक दिवस विद्यार्थ्यांनी सहन करावा अशी विचारणा करत संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले.
कोल्हापूर : शिये (ता.करवीर ) येथील आय.ओ.एन परीक्षा केंद्रावर रविवारी आयबी पीएस क्लार्कच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे सोबत आणून देखील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने मोठा गोंधळ उडाला. प्रत्येक परीक्षेवेळी गोंधळ हेच या केंद्राचे वैशिष्ट्य बनले आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना आधार कार्ड पॅन कार्ड अथवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी ओळखीचा पुरावा यासाठी एखादा कागदपत्रे लागतात परंतु सर्व कागदपत्र असताना देखील येथील केंद्र चालकांनी सुमारे 50 विद्यार्थ्यांना आधार कार्ड अपडेट नसल्याच्या कारणास्तव परीक्षेला बसू दिले नाही.
केंद्र चालकांचा हा मनमानी कारभार कित्येक दिवस विद्यार्थ्यांनी सहन करावा अशी विचारणा करत संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तीन- चार वर्ष अभ्यास करत असतात. कराड पंढरपूर सोलापूर पुणे गोवा कोल्हापूर इथून विद्यार्थी येतात. मागील काही दिवसांपूर्वी दोन विद्यार्थ्यांच्याकडे मोबाईल आढळला विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला परंतु यांना सहकार्य करणाऱ्या केंद्र चालकांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
गोव्यामधून आलेल्या एका विद्यार्थ्याच्या आधार कार्डवर फोटो हुबेहूब दिसत नसल्याच्या कारणावरून त्याला प्रवेश नाकारला त्या विद्यार्थ्याने येताना केस कट करून आला होता. कोल्हापूर मधील एक विद्यार्थी 5 ऑगस्टला आयबीपीएस आर आर बी पीओ या परीक्षेसाठी बसला होता आज देखील त्याने या परीक्षेसाठी फॉर्म भरला होता त्या दिवशी त्याला सर्व कागदपत्रांसहित प्रवेश दिला आज तीच कागदपत्रे असताना त्याला परीक्षा केंद्र चालकांनी प्रवेश नाकारला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी केंद्र चालकांना या संदर्भात जाब विचारला असता त्यांनी तिथून पळ काढला.
विद्यार्थी 12 ते 14 तास अभ्यास करून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात परंतु या परीक्षा केंद्राच्या मनमानी कारभारामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली नाही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी पोलीस व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष निलेश सुतार, श्रीनाथ पाटील, नेहा पाटील, स्वाती पाटील, मिलिंद गिरवडे उपस्थित होते.