गारगोटी बाजारातील बेशिस्तपणा ठरतोय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:28 AM2021-02-17T04:28:35+5:302021-02-17T04:28:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी/शिवाजी सावंत : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गारगोटी गावात बुधवारी भरणाऱ्या आठवडा बाजारातील बेशिस्तपणा डोकेदुखी ठरत आहे. ...

The chaos in the silica market is a headache | गारगोटी बाजारातील बेशिस्तपणा ठरतोय डोकेदुखी

गारगोटी बाजारातील बेशिस्तपणा ठरतोय डोकेदुखी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी/शिवाजी सावंत : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गारगोटी गावात बुधवारी भरणाऱ्या आठवडा बाजारातील बेशिस्तपणा डोकेदुखी ठरत आहे. वाहतुकीची कोंडी होऊन दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहनधारकांबरोबरच सामान्य माणसांनाही त्याचा त्रास होत आहे.

भुदरगड तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. दोन गडकोटांमुळे येथे पूर्वापार आठवडा बाजार भरत आहेत. इंग्रज राजवटीपूर्वी शेणगाव, पेठशिवापूर, पाटगाव, मडीलगे येथे आठवडा बाजार भरत होते. इंग्रज सरकारने आपली कचेरी गारगोटी येथे आणली. तेथून पुढे तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून गारगोटी शहराची ओळख निर्माण झाली. गारगोटीशिवाय कडगाव, कुर, मडीलगे, पिंपळगाव, पाटगाव येथे आठवडा बाजार भरतो.

गारगोटी आठवडा बाजार पोलीस ठाण्यापासून सरकारी दवाखान्यापर्यंत पूर्व पश्चिम भरतो. परंतु सध्या मूळ जागा सोडून तो सोनाळी रस्ता, पिंपळगाव रस्ता, गारगोटी बसस्थानकाकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचला आहे. विक्रेत्यांची संख्या वाढल्याने कोणी कोठे बसतो, याचा ताळमेळ नाही. विक्रेत्यांना कोणाचीही धास्तीच न राहिल्याने बेशिस्तपणा वाढला आहे. रस्त्याच्या मध्यापर्यंत दोन्ही बाजूने विक्रीसाठी पाल मांडून दुकाने थाटली जात आहेत. गर्दीमुळे चार दोन मोबाईल, सोने, पैशाचे पाकीट चोरीला जाण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. परिसरातील गावांना जाण्यासाठी मुख्य मार्ग असल्याने येथे वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. ग्रामपंचायतीने बाजाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, नव्याचे नऊ दिवसच राहिले. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे बाजार भरत आहे. वाहतूक थांबली की दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्यातून छोटे-मोठे अपघातही होतात. (उद्याच्या अंकात हलकर्णी बाजार)

काय करता येईल....

गारगोटी बाजार भरवण्यासाठी दुसरी जागा नसली तरी शिस्त लावणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने विक्रेत्यांना वाहतुकीस अडथळा होणार नाही, असे नियोजन करून दिले पाहिजे. पोलीस यंत्रणेने बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

कोट-

गारगोटी ग्रामपंचायतीला गेले दीड वर्ष झाले पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्याने बाजारपेठ विस्कळीत झाली आहे. बाजाराबाबत आम्ही गांभीर्याने विचार करीत असून विक्रेत्यांसह वाहनधारकांना शिस्त लावू.

- संदेश भोपळे (सरपंच, गारगोटी)

फोटो : गारगोटी बाजारामुळे मुख्य रस्त्याची झालेली कोंडी. (फोटो-१६०२२०२१-कोल-गारगोटी)

Web Title: The chaos in the silica market is a headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.