ग्रामसेवकांचा अनागोंदी कारभार; बेनिक्रे ग्रामपंचायतीला सरपंचांनीच ठोकले टाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 14:22 IST2022-06-03T14:22:05+5:302022-06-03T14:22:29+5:30
गेल्या वर्षभरापासून गटविकास अधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रार करूनही दखल घेतली गेली नसल्याने ही संतापाची लाट उसळली.

ग्रामसेवकांचा अनागोंदी कारभार; बेनिक्रे ग्रामपंचायतीला सरपंचांनीच ठोकले टाळे
म्हाकवे : बेनिक्रे (ता.कागल) येथील ग्रामसेवक आण्णाप्पा कुंभार यांचा मनमानी, कामचुकार व भ्रष्ट कारभार आणि वरिष्ठ अधिकार्यांचीही याकडे कानाडोळा करत असतील तर ग्रामपंचायत कार्यालयालायाचा उपयोगच काय? या संतापातूनच चक्क सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनीच कार्यालयाला टाळे ठोकले. गेल्या वर्षभरापासून गटविकास अधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रार करूनही दखल घेतली गेली नसल्याने ही संतप्त सदस्यांनी हे पाऊल उचलले.
घरफाळा व पाणीपट्टी वसूल करून बँक खात्यात जमा न करता परस्पर खर्च करणे, शासनाकडून आलेला निधी तीन वर्षांपासून वाटप झालेला नाही. कर्मचार्यांना मानधन व फंडाची रक्कम मिळालेली नाही. आशा स्वयंसेविकांना कोरोना काळातील अनुदानही दिलेले नाही. तसेच, सरपंच, सदस्यांना विश्वासात न घेताच ग्रामसेवक कुंभार हे कारभार करत आहेत. याबाबत वरिष्ठाकडे तक्रार करुनही दखल घेतली गेली नाही. अखेर संतापलेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनीच आज, शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.
यावेळी सरपंच अश्विनी गुरव, संदीप वाडकर, कृष्णा जाधव, शिपाई आनंदा वाडकर, दिव्यांग प्रतिनिधी निलेश हासबे, आशा स्वयंसेविका अश्मिता पालकर, माजी सरपंच काकासाहेब काळूगडे, दिनकर मगदूम, उपसरपंच सुर्याजी जाधव, सदस्य सचिन वाडकर, सतिश पालकर आदी उपस्थित होते.
राजकीय वरदहस्त
तब्बल वर्षभर वरिष्ठांकडे लेखी तक्रारी केल्या, दीड महिन्यापुर्वी ग्रामपंचायतीला टाळे घालण्याचा इशारा दिला. तरीही प्रशासन दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामसेवक कुंभार यांना राजकीय वरदहस्त मिळत आहे की काय अशी शंकाही ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
ग्रामसेवक बदलून मिळाल्यानंतरच हे टाळे काढू. तसेच, कुंभार यांच्या बदलीबाबत ठाम असून प्रसंगी सामुहिक उपोषणालाही बसण्याचा निर्धार केला आहे. -अश्विनी गुरव, सरपंच बेनिक्रे